मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद सुरु असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचंदेखील नाव आलं होतं. मात्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही, असा खुलासा रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी केला आहे (Rhea Chakraborty lawyer Satish Manshinde said she does not know Aaditya Thackeray).
“रिया कधीही आदित्य ठाकरे यांना भेटली नाही. आदित्य हे राजकारणी आहेत, त्यामुळे ती त्यांना ओळखते. पण ती वैयक्तिक कधीही आदित्य ठाकरे यांना भेटली नाही, त्याचबरोबर ती त्यांच्याशी कधीही फोनवर बोललेली नाही”, असं स्पष्टीकरण रिया चक्रवर्तीच्यावतीने तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी केलं आहे (Rhea Chakraborty lawyer Satish Manshinde said she does not know Aaditya Thackeray).
हेही वाचा : ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण विश्वास, मनसेचा आदित्य ठाकरेंना भक्कम पाठिंबा
“रिया अभिनेता दिनो मोरिया यांना ओळखते. कारण ते चित्रपट क्षेत्रात आहेत. दोघं एकाच क्षेत्रात असल्यामुळे रिया दिनो मोरया यांना ओळखते”, असं रियाच्या वकीलांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्या नावाने सुरु असलेला युक्तीवाद अत्यंत निरर्थक असल्याचं वकील मानशिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षाकडून आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरदेखील विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात होते. याप्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देऊन खुलासा केला आहे. याशिवाय शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीदेखील आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
“सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला होता.
“मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा : ‘सुशांत सिंह प्रकरणातील साक्षीदारांच्या हत्या होऊ शकते’, सुशांतचा भाऊ आणि भाजप आमदाराचा दावा
“कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
“सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
“मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईस या भ्रमात कोणी राहू नये”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.
संबंधित बातम्या :
ही वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी, सुशांत प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं
सुशांतचा भाऊ संजय राऊतांना भिडणार, मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा