औरंगाबादः भोकरदनहून सिल्लोडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱा 30 टन तांदूळ वाहतूक पोलिसांनी पकडला. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ पोलिसांनी हे वाहन पकडले. पोलिसांनी तांदुळाने भरलेला हा ट्रक जप्त करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला.
सोमवारी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भारत माने, पोलीस कर्मचारी अजरुद्दीन शेख, सुरेश मोरे वाहनांवर कारवाई करीत होते. यादरम्यान भोकरदनकडून एक ट्रक तांदूळ भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या माहितीवरून पिंप्री फाट्याजवळ सापळा लावला. सदर माहिती मिळालेल्या क्रमांकाच ट्रक येताच पोलिसांनी थांबवला. तपासणी केली असता ट्रक तांदळाने भरलेला असल्याचे समोर आले. हा माल कुठून आणला अशी विचारपूस केली असता ट्रक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान हा ट्रक पोलिसांनी जप्त करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. ट्रकमध्ये 30 टन तांदूळ असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हा ट्रक कुठून भरून आला, कुठे चालला होता, याचा तपास पोलीस करीत असून यात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी सदरची माहिती महसूल विभागाला दिली. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरातील आदर्श नगरात डॉ. हनुमय्या मार्ता यांचे कुटुंब राहते. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी घराचे फाटक उघडून दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. यावेळी दोन मुली आणि एका महिलेला मारहाण केली. हे दरोडेखोर हिंदी आणि मराठी भाषेत संवाद साधत होते. त्यांच्याकडे टॉमी, गज, रॉड यासारखी घातक अवजारे होती. आरडाओरड केली तर जिवे मारू, अशी धमकी या चोरट्यांनी घरच्यांना दिली होती. दहा मिनिटांच्या थरारात कुटुंब घाबरून गेले. तर त्यांची २५ वर्षांची व्यकंट रमना ही मुलगी चोरांनी केलेल्या मारहाणीत जालना येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच डॉ. मार्ता यांच्या गुडघ्याला रॉडचा मार लागला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ चोरांचा पाठलाग सुरु केला. पण बाइकवरून फरार होण्यात चोर यशस्वी झाले.
इतर बातम्या