संगमनेर (अहमदनगर) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संगमनेरमध्ये भर कार्यक्रमात मंचावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला. संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’त आज ‘संवाद तरुणाईशी’नावाचा युवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्धकी यांना बोलतं केलं.
या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी सर्वाना एक टास्क दिला. एखाद्या व्यक्तीला फोन लावतोय असं भासवत त्यांच्याशी संवाद साधायचा, असा तो टास्क होता. या टास्कवेळी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला.
रोहित पवार नरेंद्र मोदींना काय म्हणाले?
“नमस्ते मोदी साहेब, रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. साहेब काही नाही, थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्याठिकाणी आलो होतो. अनेक युवक-युवती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष जो विकास झाला नव्हता तो आता होईल.”
“आमच्या युवक-युवतींना उद्याच्या काळात चांगली नोकरी मिळावी यासाठी जे इंडस्ट्रियल धोरण आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचे झालं आहे. त्या धोरणांमध्ये आपण बदल कराल अशी इच्छा आहे. त्यामुळे राज्याच्या युवक-युवतींना नोकरी मिळेल. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्या. आम्ही सर्वजण खूश आहोत. इथली लोकंदेखील खूश आहेत. पण आपण केंद्र सरकारमध्ये थोडेसे बदल करावेत. चारच वर्षे राहिली आहेत. आपण लक्ष द्याल आणि देशाची जनतेची काळजी घ्याल. आपण बिझी असाल आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद!”