पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं बोललं जातंय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार अंतर्गत वादातून पडणार असल्याचा दावा केला. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Rohit Pawar on Devendra Fadnavis). भाजपच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचं चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटतं तशी परिस्थिती नाही, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात सिंचन भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
रोहित पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचं चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही. त्यांच्या मनात कुठेतरी काही तरी व्हावं हेच आहे. मात्र सरकारमध्ये संवाद आणि चर्चा होत आहे. एक हाती कारभार आमच्यात नाही. आम्ही चर्चा करुन अनुभवाचा फायदा घेऊन लोकहिताचे निर्णय घेतो.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“भाजपनं राजकीय पतंगबाजी करण्याऐवजी जनतेच्या अडचणी आणि समस्या पहाव्यात. भाजपचे नेते पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत? ते राजकीय सोयीचं बोलत असून राजकारण करत आहेत. भाजप लोकांचा विचार करत असेल, तर त्यांनी केंद्र सरकारचा विरोध करावा,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
“सारथी प्रकरणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली आहे. इतर अनेक व्यक्ती बोलले आहेत. मी साधा कार्यकर्ता असून माझं आघाडीपेक्षा वेगळं म्हणणं नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे आणि निर्णय घेत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात असल्यानं त्यावर टिपण्णी करणे योग्य नाही,” असंही रोहित पवारांनी म्हटलं.
‘परीक्षांविषयी सरकारकडून वेगवेगळ्या संघटनांशी बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय’
रोहित पवार म्हणाले, “महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांविषयी सरकारने वेगवेगळ्या संघटनांशी बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. देशात सर्व राज्यात सर्वात जास्त मुलं महाराष्ट्रात शिक्षण घेतात. त्यामुळे सर्वांचा एकत्रित निर्णय घेण्याऐवजी राज्याचा वेगळा निर्णय घेणे अपेक्षित आहे.”
“कर्जत, जामखेड मतदार संघातील आणि दौंड तालुक्यातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सिंचन भवनाला भेट दिली. दोन्ही ठिकाणी पाण्याचे योग्य नियोजन आणि नदीच्या पाण्याचा योग्य वापर करून उन्हाळ्यात पाणी देण्याचा विषय आहे. त्याचबरोबर कुकडी प्रकल्प, सीना प्रकल्प आणि दुष्काळी भागात पाणी देण्याचा विषय आहे,” अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
हेही वाचा:
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह
नारायण राणेंच्या खांद्यावरुन भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी का? : काँग्रेस
Rohit Pawar on Devendra Fadnavis