बीड : नोकरीवर तैनात असताना कोणतेही कारण पुढे करुन बीडचे पोलीस अधीक्षक अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे माझं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची तक्रार बीडमधील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने केली आहे (Serious Allegations on Beed SP). तसेच या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे स्वेच्छा निवृत्ती मागितली आहे. यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पीडित पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी पोलीस महासंचालकांना तसे रितसर पत्रच पाठविले आहे. त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.
पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार हे 19 मार्च 2019 रोजी बीड जिल्ह्यात तैनात झाले. आतापर्यंत त्यांनी परळी ग्रामीण, बीड वाहतूक शाखा आणि पोलीस नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावले. मात्र गेल्या वर्षभरापासून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप पेरगुलवार यांनी केला आहे. “तुम्हाला डोके नाही, तुम्ही परीक्षा कसे पास झालात, तुला जोड्याने मारतो” अशा अभद्र शब्दात पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी अपमानित केल्याचाही आरोप पेरगुलवार यांनी केला.
माझे स्वास्थ्य बिघडले आहे. याचा परिणाम माझ्या कुटुंबावर झाला आहे. पोलीस दलात नोकरी करण्याची इछा असून देखील मला करता येत नाही, असं म्हणत पेरगुलवार यांनी स्वेच्छा निवृत्ती देण्याची विनंती मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी आपल्या तक्रारीत माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे जबाबदार राहतील असंही लिहिलं आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मात्र बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा :
खाकी वर्दीतील वऱ्हाडी, कन्यादानाला पोलीस अधीक्षक, बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचा विवाह सोहळा
20 फूटबॉल मैदानांइतके विस्तीर्ण, 10 हजार बेड क्षमता, जगातील सर्वात मोठं कोविड सेंटर दिल्लीत
चिमुकल्या भावंडांकडून 15 हजारांची ईदी कोरोना लढ्याला, अजितदादांनी कौतुकाने खाऊचा पुडा दिला
Serious Allegations on Beed SP