आयेशा सय्यद, मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे, सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणांमुळे (Environment Policy) स्वस्त आणि किफायतशीर तसेच प्रदुषण विरहीत पर्यायांची मागणी जोर धरू लागली आहे. नजीकच्या काळात भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड (Electric and Hybrid) वाहनांची संख्या वाढू शकते, असे डेलॉइटच्या (Deloitte) अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार आता देशात ज्या वाहनांचा वापर करत आहेत, त्याला पर्याय शोधण्यात येत आहे. पूर्वीपेक्षा जास्त ग्राहक इलेक्ट्रिक वाहने आणि हायब्रीड वाहनांमध्ये रस दाखवत आहेत.डेलॉइटने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल ऑटोमोटिव्ह कन्झ्युमर स्टडीज रिपोर्ट (Global Automotive Consumer Studies Report) 2022 नुसार, एक तृतीयांशपेक्षा जास्त भारतीय ग्राहकांनी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांमध्ये रस दाखवला आहे. अहवालात साथरोगामुळे पर्यावरण पूरक वाहतुकीकडे भारतीय आकृष्ट झाल्याचे नमूद केले असले तरी वाढत्या इंधन किंमतीमुळे वाहनधारक हवालदिल झाल्याचे खरे कारण असून स्वस्त व किफायतशीर पर्यायाचा शोध घेतला जात असल्याचे चित्र आहे.
प्रदूषणाबाबत चिंता वाढली
या अहवालानुसार 59 टक्के भारतीय ग्राहक हवामान बदल, प्रदूषणाची पातळी आणि पेट्रोल-डिझेल वाहनांच्या उत्सर्जनाबाबत चिंतेत आहेत. परिणामी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहक खेचल्या जात आहे. या वाहनांचा खप वाढल्यास कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या अहवालानुसार 2022-23 च्या अर्थसंकल्पात हरित तंत्रज्ञानावर आधारित वाहनांना प्रोत्साहन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशनवर (Charging Station) इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल. डेलॉइट इंडियाचे भागीदार आणि ऑटोमोटिव्ह हेड राजीव सिंह म्हणाले, ‘ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि नवकल्पनांमुळे भारतीय वाहन उद्योगात विकासाचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. आमचा हा अभ्यास ग्राहकांच्या बदलत्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारा आहे.’ नजीकच्या काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विशेषत: दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची मोठी मागणी असेल, असा दावा त्यांनी केला.
इंधनाचे वाढते दर डोकेदुखी
पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे, सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणांमुळे (Environment Policy) स्वस्त आणि किफायतशीर तसेच प्रदुषण विरहीत पर्यायांची मागणी जोर धरू लागली आहे. शहरांतर्गत फिरण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यात येत आहे. परिणामी या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन तर देतच आहेत, पण त्यांना सवलत ही देण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. नवनवीन मॉडेल्स बाहेर पडत आहेत. वाहनांच्या किंमती ही कमी झाल्याने इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहेत. तसेच हे वाहन खरेदीसाठी सरकारने सवलतींची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या