नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेले नाशिक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे (Bhaulal Tambde) यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) पक्षाच्या पॅनलचा विजय झाला असून सरपंच पदी दिपाली चारोस्कर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा हा पराभव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तांबडे यांनी पॅनल उभा केला होता. मात्र, पॅनलचा पराभव राष्ट्रवादीने केल्याने दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिंडोरी तालुक्यात नरहरी झिरवाळ आमदार असून विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांचाच करिश्मा तालुक्यात असल्याचे दिसून येत आहेत.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचयातीवर राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.
दिंडोरीच्या वणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे मधुकर भरसट विजयी झाले आहेत. त्यांचा हा निकाल तालुक्यातील पहिला निकाल होता.
त्यानंतर जाणोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या पॅनलने विजयी मिळवला असून सरपंच पदी सुभाष नेहेरे विजयी झाले आहे.
मोहाडी ग्रामपंचयातीवर मात्र शिवसेनेने विजय मिळवत सरपंच पदी आशा लहानगे विजयी झाल्या आहे.
नळवाडपाडा येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे हिरामण गावित विजयी तर आंबेवणी ग्रामपंचायतीवर देखील राष्ट्रावादीच्या शोभा मातेरे विजयी झाल्या आहे.
करंजवण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे संदीप गांगोडे विजयी झाले असून कोचरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्याच कल्पना टोंगारे यांनी बाजी मारली आहे.
तर तळेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर यांनी विजय मिळवला असून शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.