लॉकडाऊनमध्ये गावी अडकली, ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही, डोंगरदऱ्यात झोपडी टाकून तरुणीचा अभ्यास

| Updated on: Aug 18, 2020 | 8:22 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं (Sindhudurg Girl Studying in Mountain due to Internet problem) आहे.

लॉकडाऊनमध्ये गावी अडकली, ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही, डोंगरदऱ्यात झोपडी टाकून तरुणीचा अभ्यास
Follow us on

सिंधुदुर्ग : मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर अडथळे फारच शुल्लक ठरतात. संकटावर मात करत आपल ध्येय गाठण्याची महत्त्वकांक्षा इतिहास घडवून जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम गावातील एका तरुणीने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात, डोंगरावर भर पावसात झोपडीत दिवसभर अभ्यास करते. ध्येय गाठण्याची तिची जिद्द नक्कीच सलाम करण्यासारखी आहे. (Sindhudurg Girl Studying in Mountain due to Internet problem)

स्वप्नाली सुतार …….ही कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील तरुणी. अभ्यासात हुशार असलेली स्वप्नाली मुंबईत पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमध्ये ती गावी अड़कली त्यातच तिचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. मात्र गावात साधा फोन लागताना कठीण तिथे इंटरनेट कसं असणार. मात्र ध्येयाने पछाडलेली स्वप्नाली भावाचा मोबाईल घेऊन राना-वनात इंटरनेटसाठी फिरु लागली. घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात तिला पुरेसे इंटरनेट मिळू लागले.

दिवसभर झाडाखाली उभी राहून तिने उन्हाळ्यात अभ्यास केला. मात्र पावसाळ्यात खरा प्रश्न निर्माण झाला. अनेक संकटांवर मात करत पशूपक्षांच्या, निसर्गाच्या सानिध्यात तिचा अभ्यास सुरु आहे.

 

पावसाळ्यातदेखील तिने छत्री घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तिची अड़चण आणि धडपड तिच्या भावांच्या लक्षात आली. भर डोंगरात तिच्या चार ही भावांनी त्या ठिकाणी छोटीसी झोपडी उभारली. स्वप्नाली दिवसभर या झोपडीतच अभ्यास करते.

लॉकडाऊनच्या आधी आठ दिवस गावी आलेली स्वप्नाली लॉकडाऊनमुळे इथेच अड़कली. अभ्यासात हुशार असणाऱ्या स्वप्नालीला दहावीत 98 टक्के गुण मिळाले होते. तर बारावीत प्रथम येऊन तिने आपलं अभ्यासातील कौशल्य दाखवलं. खरतर तिला डॉक्टर व्हायचं होत. पण गरिबी समोर आली. तिने पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. शेतकरी असणारे तिचे आईवडील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला नेहमीच प्रोत्साहन देत आले आहेत. जंगलात जाऊन आपल ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करणाऱ्या आपल्या कन्येचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

घरातल्या घरात अनेक सुविधा मिळूनसुद्धा शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाल्यांनी स्वप्नालीचा आदर्श बाळगायला हवा. उपलब्ध स्थितीत सुद्धा प्रयत्न केले तर मार्ग नक्कीच सापडतो हेच स्वप्नालीने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी हवी. (Sindhudurg Girl Studying in Mountain due to Internet problem)

संबंधित बातम्या :

ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग खडतर, सोलापुरातील शिक्षकांचा भिंतींवरील शिक्षणाचा नवा प्रयोग

N 95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, राजेश टोपेंनी ठणकावलं