सोलापूर : व्हॉट्सअॅप,फेसबुक आणि ट्विटर हे आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतात. हे अॅप एकप्रकारे जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. आता हेच सोशल मीडिया अॅप भुसार दुकानात ऐकायला मिळणार आहेत. सध्या सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या या APP ची नावे व्यापाऱ्यांनी गव्हाच्या पोत्यांना दिली आहेत.
एक पोतं फेसबुक दे, एक पोतं व्हॉट्सअॅप दे, किंवा एक पोतं ट्विटर दे असे कुणी म्हटले तर आपुसकच प्रत्येकाच्या नजरा संबधीत व्यक्तीकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र यात आता काहीच वावगं असं राहीलं नाही. कारण सध्या असेच शब्द सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऐकायला मिळत आहेत.
बाजारात शरबती गहू, बन्सी गहू, राधिका गहू अशी गव्हाची अनेक नावे आपल्या कानावर पडली आहेत. याशिवाय देव-देवतांची नावं धान्याला दिल्याचंही आपण पाहिलं आहे.
मात्र या सर्व नावांना मागे टाकत सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गव्हाची पारंपरिक नावे बाजूला सारत, सोशल मीडियाचे ब्रँड नाव असणारे गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर अशा विविध नावांचे गहू सध्या बाजारात आणले आहेत. त्यामुळे लोकही सहज तोंडवळणी पडलेल्या या ब्रॅण्डला अधिक पसंती देत आहेत. मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची शक्कल लढवली आहे. ग्राहकही त्याला चांगली पसंती देऊ लागले आहेत.
या नावांमुळे किचनमध्ये मोबाईलवरील व्हॉट्सअॅप, फेसबुक पाहात स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींच्या किचन कट्ट्यावरच या अॅप्सनी ठाण मांडलं आहे.