नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात निर्माण झालेल्या सुप्त तणावाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मदतीसाठी पक्षाकडून नेमण्यात आलेल्या विशेष समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीचा अजेंडा स्पष्ट करण्यात आला नसला तरी बिहार निवडणुकीतील पराभव आणि पक्षातंर्गत उमटत असलेले त्याचे पडसाद या बाबींवर बैठकीत आत्मचिंतन होण्याची शक्यता आहे. ही बैठक दुपारी पाज वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडेल. (Amid war of words among party leaders on Bihar polls byelections Congress Special Committee to meet today)
बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह 23 ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहून सोनिया गांधी यांच्याकडे पक्षनेतृत्वाविषयी नाराजीही व्यक्ती होती. त्यामुळे सिब्बल यांच्या टीकेनंतर ही लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच काँग्रेसकडून आता बिहार निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या विशेष समितीमध्ये अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, ए.के. अँटोनी, अंबिका सोनी, मुकूल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला हे गांधी घराण्याच्या मर्जीतील नेते आहेत. आजच्या बैठकीनंतर हे नेते सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधू शकतात. त्यामुळे आजच्या बैठकीत या नेत्यांना पक्षातील नाराजीवर तोडगा काढण्यात यश मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, यापैकी केवळ 19 जागांवरच पक्षाला विजय मिळाला. तर गुजरातमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. ही बाब काँग्रेस पक्षासाठी चिंताजनक मानली जात आहे.
संबंधित बातम्या:
(Amid war of words among party leaders on Bihar polls byelections Congress Special Committee to meet today)