इस्लामाबाद : पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या क्रूर दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यकृताच्या आजाराने मसूद गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. अखेर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पाकिस्तान सरकारकडून मसूदच्या मृत्यूच्या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आला नाही.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेने आयईडी स्फोट घडवला. यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात घुसून जैशच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले होते?
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील सर्वात खतरनाक असा हा म्होरक्या आहे. मात्र याच मसूद अजहरची तब्येत खराब झाल्याचे वृत्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनीही दिले होते. दहशतवादी संघटनेचा मास्टरमाइंड मसूद खूप आजारी आहे आणि त्याची तब्येत खराब असल्याने तो घरातून बाहेरही निघू शकत नाही, असं मोहम्द कुरेशी म्हणाले होते.
मसूद अजहर कोण आहे?
मसूद अजहर हा पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या क्रूर दहशतवादी संघटनेचा संस्थापक होता. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या बहावालपूर गावात 1968 साली मसूद अजहरचा जन्म झाला. काश्मीरला स्वतंत्र करा, ही मसूदची मागणी होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने मसूदला सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवलं होतं.
कंधार कांड दरम्यान दहशतवादी मसूद वाचला
1999 मध्ये एअर इंडियाचं विमान आयसी-814 च्या हायजॅकिंग दरम्यान दहशतवादी मसूद भारताच्या हातातून वाचला होता. हायजॅकिंग दरम्यान दहशतवाद्यांनी विमानातील लोकांना सोडण्यासाठी मसूदसह तीन दहशतवाद्यांना सोडा अशी अट ठेवली होती. तेव्हा भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षच्या कारणासाठी मसूदला सोडून दिले. तेव्हापासून हा खतरनाक दहशतवादी भारतासाठी डोके दुखी बनला आहे.
UN मध्ये मसूदला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव
दहशतवादाविरोधात भारताने सुरु केलेल्या या लढाईत भारताला जगातील अनेक देशांनी पाठिंबा दिला. यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानमधील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही यूएनमध्ये मसूदला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव दिला.
पुलवामा हल्ल्या मागे मसूदचा हात
पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. 14 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे मसूद अजहचा हात आहे. जैश-ए-मोहम्मद यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला सकाळी भारतीय वायूसनेने दहशतवाद्यांच्या तळावर निशाणा करत एअर स्ट्राईक केली.