दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

| Updated on: Apr 12, 2020 | 7:14 PM

'कोरोना'मुळे अनिश्चित कारणासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. (SSC Tenth Geography Exam Cancelled)

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बातमी आहे. एसएससीचा इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि  लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. (SSC Tenth Geography Exam Cancelled)

‘कोरोना’मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता.

यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळेल.

याआधी, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (SSC Tenth Geography Exam Cancelled)

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आधीच्या विषयांच्या गुणानुसार दिले जातील. मात्र शाळा-महाविद्यालय बंद असल्याने हे निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षाचे शाळांचे वर्ग सुरु झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने फी मागू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षणमंत्र्यांनी शाळांना दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत. (SSC Tenth Geography Exam Cancelled)