वेल्हा तालुक्याचं नाव बदला, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Feb 26, 2020 | 5:45 PM

वेल्हा तालुक्याचं नामांतर राजगड करावं, अशी विनंती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वेल्हा तालुक्याचं नाव बदला, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

पुणे : “छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी असा ज्याचा लौकिक आहे तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. या तालुक्यास राजगड असं नाव देण्यात यावं”, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत ही मागणी केली आहे (NCP MP Supriya Sule).

“राजगड येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले, जपले आणि ते प्रत्यक्षात आणले. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यास देण्यात यावे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

“आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड हे नाव द्यावे यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. याबाबत तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपणास विनंती आहे की, जनतेतून आलेल्या या मागणीचा विचार करुन वेल्हे तालुक्यास राजगड हे नाव द्यावे”, अशी विनंती सप्रिया सुळे यांनी केली (NCP MP Supriya Sule).

“जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते 1947 सालापर्यंत ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने 1939 साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे. येथील जनता देखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती”, असंदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.