करदात्यांच्या ओळखीसाठी आता सरकारने नवीन पॅनकार्ड जारी केला आहे. हा पॅनकार्ड आता करदात्यांसाठी क्यूआर कोडसह जारी करण्यात आलेला आहे. तसेच या पॅनकार्डसह करदात्यांच्या डिजिटल अनुभव वाढवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने (सीसीईए) पॅन २.० प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारी यंत्रणांच्या सर्व डिजिटल प्रणालींमध्ये पॅन हे प्राथमिक ओळखपत्र बनविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पावर सरकार एकूण १४३५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
पॅन २.० प्रकल्पामुळे करदाते नोंदणी सेवांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमूलाग्र बदल होण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे करदात्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. ज्यामध्ये त्यांना सेवा सहजपणे मिळू शकतील, सेवापुरवठ्याला गती मिळेल, गुणवत्ता सुधारेल, सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, त्यासोबत करदात्यांचा डेटा सुरक्षित राहील, पर्यावरणपूरक प्रक्रियेमुळे खर्च कमी होण्यास मदत होईल. सरकारी यंत्रणांच्या डिजिटल प्रणालीसाठी पॅनचा वापर सामान्य ओळखपत्र म्हणून केला जाईल जो सरकारच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पॅन 2.0 प्रकल्पात करदात्यांना क्यूआर कोडसह नवीन पॅन कार्ड विनामूल्य दिले जाईल.
पॅन 2.0 प्रकल्प हा करदात्यांना अधिक चांगला डिजिटल अनुभव देण्यासाठी पॅन सेवांच्या तंत्रज्ञान-आधारित परिवर्तनाद्वारे करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यवसाय प्रक्रियेची पुनर्रचना करण्यासाठी एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. सध्याच्या पॅन 1.0 फ्रेमवर्कचे हे अपग्रेड असेल जे पॅन व्हेरिफिकेशन सेवेला कोअर आणि नॉन-कोर पॅन/टॅन क्रियाकलापांशी देखील जोडेल, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे. देशात आतापर्यंत सुमारे ७८ कोटी पॅन जारी करण्यात आले असून, त्यापैकी ९८ टक्के पॅन वैयक्तिक पातळीवर देण्यात आले आहेत.
पॅन क्रमांक हे प्राप्तिकर विभागाकडून जारी केले जाणारे १० अंकी अल्फान्यूमेरिक ओळखपत्र आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे कार्ड दिले जाते. पॅन क्रमांकाच्या माध्यमातून प्राप्तिकर कोणत्याही व्यक्तीच्या ऑनलाइन किंवा आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते, तसेच देशातील सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन हे सर्वात प्रमुख ओळखपत्र आहे, जसे की मतदानासाठी मतदार ओळखपत्र.