पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे. बिहारमध्ये सत्ता महागठबंनचीच येणार, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे (Tejaswi Yadav first reaction on Bihar Election Result).
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज (12 नोव्हेंबर) महागठबंधनच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित केलं. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खातेवाटपावरुन एनडीएतील घटकपक्षांमध्ये बिनसलं तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे बिहारमध्ये काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचा संशय तेजस्वी यांना आहे. त्यामुळे त्यांनी सर्व आमदारांना पाटण्यातच थांबवण्याचं आवाहन केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे (Tejaswi Yadav first reaction on Bihar Election Result).
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांनी आज निकालावर प्रतिक्रिया दिली. “परिणाम आणि निर्णय या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. निवडणुकीचे परिणाम त्यांच्या बाजूने तर निर्णय आपल्या बाजूने आहे”, असं तेजस्वी यादव आमदारांना म्हणाले.
“मी नम्रपणे हात जोडून बिहारच्या जनतेचं आभार मानतो. जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने आहे. आम्हाला जवळपास 130 जागा मिळाल्या आहेत. मात्र, नितीश कुमार यांनी फसवणूक करुन सरकार बनवलं”, अशी टीका तेजस्वी यादव यांनी बैठकीनंतर केली.
…तर भाजपला विरोधी बाकावर बसावं लागेल
बिहारमध्ये महागठबंधनला 110 तर एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला आहे. पण एनडीएमत निवडणुकीपूर्वी सामील झालेले विकासशील पार्टी आणि हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षांनी महागठबंधनसोबत हातमिळवणी केली तर बिहारमध्ये नितीशकुमार यांचं सरकार पडेल. कारण विकासशील पार्टी आणि हिंदुस्तान आवाम मोर्चा या दोन्ही पक्षांना प्रत्येक 4 जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे एमआयएम पक्षाकडे पाच जागा आहेत. हे तीनही पक्ष महागठबंधनमध्ये सामील झाले तर 122 हा मॅजिक आकडा गाठणं शक्य होईल. हे शक्य झाल्यास भाजपला बिहार विधानसभेत विरोधी बाकावर बसावं लागेल.
संबंधित बातम्या :
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु