खरंतर प्रेमाचा असा काही ठराविक दिवस नसतो. मात्र, आज म्हणजे 14 फेब्रुवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. तरुणाईचा दिवस म्हणून जरी याकडे पाहिलं जात असलं, तरी हल्ली सर्व वयोगटातील माणसं व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. गेल्या काही वर्षांपासून तर एखाद्या सणासारखा व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. तुमच्या या व्हॅलेंटाईन डेला आणखी रंगत आणण्यासाठी आम्हीही थोडी मदत करणार आहोत. तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी बॉलिवूडमधील निवडक दहा गाणी एकाच ठिकाणी देत आहोत.
1. शाहरुख आणि काजोलच्या सहजसुंदर अभिनयाने आणि स्वित्झर्लंडचं नयनरम्य निसर्गाने भरलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमा आजही सुपरहिट मानला जातो. ज्या ज्यावेळी भारतात प्रेमाच्या गाण्यांचा उल्लेख होतो, त्या त्या वेळी डीडीएलजेचा उल्लेख होतो, इतकी भिडणारी प्रेमगीतं यात आहेत. त्यातीलच एक ‘तुझे देखा तो ये जाना सनम..’
2. ‘बॉम्बे’ 1995 साली रिलीज झाला होता. यातील दिग्गज गायक हरीहरन यांनी गायलेलं आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘तू ही रे’ गाणंही प्रेमाची भावना व्यक्त करणारं अफलातून गाणं आहे.
3. कॉलेजच्या तरुणाईचं सगळ्यात आवडतं आणि 90 च्या दशकातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेलं गाणं म्हणजे ‘पहेला नशा..’. आमीर खानच्या ‘जो जिता वहीं सिकंदर’ सिनेमातील या गाण्याने पहिल्यांदा प्रेम करणाऱ्यांच्या भावना नेमक्या शब्दात मांडल्या आहेत.
4. राज कपूर आणि नर्गीस यांच्या अभिनयाने अजरामर झालेलं ‘प्यार हुआ इकरार हुआ’ गाणं म्हणजे प्रेमाचा उत्सव साजरा करणारं नेमकं गीत. लता मंगेशकर आणि मन्ना डे यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातील हे गाणं आजही मोठ्या संख्येने पाहिले जाते, पसंत केले जाते.
5. अनिल कपूरच्या ‘1942 : अ लव्ह स्टोरी’ सिनेमातील ‘एक लडकी को देखा तो’ हे गाणंही व्हॅलेंटाईन डे निमित्त नक्की ऐकायलाच हवं. कुमार सानू यांच्या बहारदार आवाजाने या गाण्याला चार चाँद लागले आहेत.
6. प्रेमावरील सिनेमांबद्दल चर्चा सुरु झाली की, ‘वीर जारा’ सिनेमाचा नक्कीच उल्लेख होतो. शाहरुख आणि प्रीती झिंटा यांच्या सहसुंदर अभिनयाने हा सिनेमा सुरपहिट ठरला होता. यातील ‘तेरे लिए’ हे गाणं आजही गुणगुणलं जातं.
7. काही वर्षांपूर्वीच आलेल्या ‘आशिकी 2’ मधील ‘तुम ही हो’ गाणं आजही अनेकांच्या मोबाईलची रिंगटोन किंवा कॉलरट्युन असते. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं भावनिक गाण्यांचा बादशाह अरिजित सिंग याने गायलं आहे.
8. साधना आणि मनोज कुमार यांच्यावर चित्रित झालेलं आणि लता मंगेशकर यांचा आवाज लाभलेलं ‘लग जा गले’ हे गाणं अजरामर झालंय. ‘वो कौन थी?’ या 1964 सालच्या सिनेमातील हे गाणं आहे.
9. प्रेमाच्या भावना नेमक्या मांडणारं ‘बहुत प्यार करते हैं’ हे ‘साजन’ सिनेमातील गाणं. या गाण्याला चार चाँद लागले ते माधुर दीक्षितच्या अभिनयाने.
10. आमिर खानच्या ‘गजनी’ सिनेमातील ‘कैसे मुझे’ हे गाणंही अनेकांच्या आवडीचं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे गाणं ऐकायला किंवा ऐकवायला हवंच.