नाशिक : द्राक्षांचं सगळ्यात मोठं उत्पादन केंद्र असलेल्या नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांना लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका (Loss of grape planters nashik) बसला आहे. डोळ्यात तेल घालून वर्षभर तयार केलेले द्राक्ष विकले जात नसल्याने अखेर या द्राक्षांचे मनुके तयार करून अक्षरशः 5 रुपये किलोने विकण्याची वेळ नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांवर (Loss of grape planters nashik) आली आहे.
नाशिकचे विनोद भांडूरे हे गिरनारे गावात राहतात. यांची एकूण तीन एकरची शेती आहे. त्यामध्ये त्यांची द्राक्ष बाग आहे. वर्षभर त्यांनी तळहाताच्या फोडासारखं आपल्या द्राक्ष बागाला जपलं आणि वाढवलं. भांडूरे यांनी आतापर्यंत सुमारे साडे चारलाख खर्च या बागेसाठी केला. द्राक्षाची छाटणी झाली आणि द्राक्ष विकले गेले तर किमान दोन पैसे हाताशी मिळतील असा विश्वास भांडूरे यांना होता. पण लॉकडाऊनमुळे भांडूरे यांचे सगळे धुळीस मिळालं आहे. या द्राक्षांचे मनुके तयार करुन ते किमान 60 रुपये भावाने विकले जातील अशी अपेक्षा भांडूरे यांनी व्यक्त केली.
द्राक्ष बागायतदारांनी आपले द्राक्ष मनुका तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना 5 रुपये किलोने विकले आहेत. त्यात देखील व्यापारी 1 क्विंटल मागे 5 किलो घट धरतात. कधी अवकाळी तर कधी गारपिटीचा फटका सहन करत उभा केलेला बाग आता नुकसानीत विकावा लागतो आहे, असं देखील इथले बागायतदार सांगत आहेत
लॉकडाऊनमुळे एकीकडे सगळे उद्योग व्यापार बंद झालेले असताना द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या आहेत. बाग तोडण्यापेक्षा मिळतील ते दोन पैसे पदरात पाडून घेण्याची द्राक्ष बागायतदारांची मानसिकता झालेली आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत साडे तीन हजार तर राज्यात 600 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.