औरंगाबादः सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रसूतीच्या (Mother gave birth) वेदना होऊ लागलेल्या मातेला घेऊन जाणारी रिक्षा जालना रोडवर अचानक बंद पडली. रिक्षातच सदर महिलेला प्रसूती कळा आल्या आणि त्यातच तिची प्रसूती झाली. मात्र वाहतूक पोलिसांनी (Aurangabad traffic police) समय सूचकता दाखवत माता आणि बाळाला तत्काळ घाटी रुग्णालयात नेले आणि या दोघांचेही प्राण वाचवण्यात मदत केली.
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जालना रोडवरील वाहतूक तशी कमी होती. हायकोर्टाच्या पुढे उभ्या असलेल्या एका रिक्षातून महिलेच्या वेदनेचा आवाज ऐकू येत होता. बाजूलाच कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार संतोष चंद्रसेन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा एका महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिल्याचे दिसले. जाधव यांनी आपले सहकारी पोलीस नाईक रावसाहेब पचलोरे यांच्या मदतीने तत्काळ दुसरा रिक्षा थांबवला. त्यातून महिलेला घाटीत पोहोचवले. तिथे त्वरीत उपचार मिळाल्याने बाळ आणि आई सुखरूप आहेत.
सदर महिलेचे नाव अनुराधा गणेश बरथरे असून त्या मुकुंदवाडीत राहतात. सोमवारी महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न कुटुंबियांचा सुरु होता. मात्र रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांनी रिक्षा बोलावली. पण ती वाटेतच बंद पडल्यानंतर वाहतूक पोलीस देवाच्या रुपाने आले आणि महिलेला घाटीत नेले. त्यांच्यामुळेच महिला व तिचे बाळ सुखरूप असल्याची प्रतिक्रिया बरथरे कुटुंबियांनी दिली. घाटीत सध्या महिलेवर उपचार सुरु आहेत.
इतर बातम्या-