मुंबई : आजच्या जीवनशैलीमध्ये फिटनेसच खूप महत्व आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे माणसांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढायला लागले आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे निरोगी रहाणे. मात्र वजन कमी करणे म्हणजेच फिट राहणे, असा अनेकांचा समज असतो. मग त्यासाठी आपण जिम लावतो, वेगवेगळे डाएट करतो. याने कदाचित वजन कमी होत असेल, पण जिम न जाता देखील तुम्ही फिट राहू शकता.
‘क्वॉर्ट्झ’मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, जगात सर्वात जास्त जगणारे लोक हे ना जिममध्ये जात, ना मॅरेथॉनमध्ये भाग घेत आणि नाही कधी डंबल उचलत. हे ब्लू झोनमध्ये (जे लोक सरासरीपेक्षा अधिक जगतात) राहणाऱ्या लोकांबाबत म्हटलं जात आहे. ब्लू झोनमधील लोक नेहमी हलत असतात, ते एका ठिकाणी स्थिर बसत नाहीत.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, आठवड्यात सहा तास पायी चालणे तुमचं वय वाढवू शकतं. या रिसर्चनुसार, वेगाने चालल्याने आपल्या जगण्याची शक्यता 32 टक्क्यांनी वाढते. दर आठवड्याला सहा तास चालल्याने हृदयाचे रोग, श्वसन प्रणालीचे रोग तसेच कर्करोग संबंधित जोखीम कमी होऊ शकते.
सुरुवातीला जर शक्य असेल तर ऑफिसपर्यंत चालत किंवा सायकलने जा. बाजारात पायी जा. घरातली लहान-सहान कामं करा. दिवसातून थोड्या-थोड्या वेळाने 5 मिनिटे पायी फिरा. शक्य त्या ठिकाणी चालत जा.
आजच्या जीवनशैलीत रोज पायी चालणे जरा कठीण आहे, कारण त्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. पण तुम्हाला रोगांपासून दूर राहायचे असेल तर पायी चालणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर जमेल तेवढे पायी चालणे याचाही आपल्या शेड्यूलमध्ये समावेश करून घ्या.