पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आलं आहे (Thieves stole alcohol). लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही दुकाने सुरु नाहीत. त्यामुळे मद्यपींची मोठी पंचाईत होत आहे. यातूनच काही तळीराम चक्क दारुची दुकाने फोडून दारुची चोरी करत असल्याच्या धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. इंदापूर तालुक्यातल्या भिगवण येथे 3 दारुड्यांनी एका देशी दारुचं दुकान फोडून 1 लाख 80 हजारांची दारु लंपास केली (Thieves stole alcohol).
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि भिगवण पोलिसांच्या संयुक्त पथकानं चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद केलं आहे. सुरेश सप्ताले, सचिन हरिभाऊ जगताप आणि तुषार उर्फ रघु शंकर झेंडे अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी लॉकडाऊनच्या काळात दारु मिळत नसल्यामुळे चोरी केल्याची कबुली दिली आहे. या तिघांनी 13 एप्रिल रोजी ही चोरी केली होती.
आरोपींनी चोरी केलेल्या दारुपैकी काही दारु स्वतः पिली तर काही दारुची विक्री केल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळील शिल्लक दारु जप्त केली आहे. या आरोपींना भिगवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या आरोपींपैकी राहुल सप्ताळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, विजय कांचन, धीरज जाधव, अक्षय जावळे, अंकुश माने, संदीप लोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊन 2 : लग्न समारंभ आणि मद्यविक्रीबाबत सरकारचा निर्णय काय? गृहमंत्रालयाची गाईडलाईन…
Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड