औरंगाबादः एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जवळपास महिनाभरापासून राज्यभरातील बससेवा बंद आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांना याचा मोठा फटका बसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दिवाळीपूर्वी औरंगाबादमधील पर्यटन पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागले होते, मात्र एसटी संपामुळे पर्यटन (Tourism) व्यवसायाची मोठी अडचण झाली आहे. औरंगाबादमधील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची (Ajanta Caves) बस सेवा बंद आहे. यामुळे महामंडळाचा 44 लाखांचा महसूल बुडाला आहे. बस बंद असल्याने खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाचे राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात सोयगाव आगाराचे कर्मचारी सहभागी झाल्याने 9 नोव्हेंबरपासून अजिंठा लेणीची बससेवा बंद पडली आहे. यामुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल झाले होते. पर्यटकांना बैलगाडीने किंवा पायी लेणीपर्यंत जावे लागत होते. पर्यटन विकासाच्या मागणीवरून 11 नोव्हेंबरला खासगी वाहनांना पर्यटकांनी ने-आण करण्याची परवानगी देण्यात आली होती. ती वाहनेदेखील कमी पडत असल्याने 15 नोव्हेंबरला पुन्हा 4 खासगी ट्रॅव्हल बसला परवानगी देण्यात आली. त्यानंतरही आणखी काही वाहनांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे सध्या 17 वाहने पर्यटकांना सेवा देण्यासाठी लेणीत उपलब्ध आहेत.
अजिंठा लेणीत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना अडचणी येत असल्याने तसेच यामुळे महसुलावरही मोठा परिणाम होत असल्याने या परिसरातील बससेवा लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. लेणीपासून सोयगाव आगाराला मिळणारा 22 दिवसांचा 44 लाख रुपये इतका महसूल बुडाला आहे. ही बससेवा बुधवारपासून सुरळीत होईल, असे संकेत सोयगाव आगारप्रमुखांनी दिले आहेत.
इतर बातम्या-