सातारा : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहेत (Udayanraje Bhosale on Corona). याबाबत भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना विचारला असता “मृत्यू कोणाच्या हातात नाही. जो मरणार तो मरणार आणि जो जगणार तो जगणार. प्रत्येक मृत्यू हा कोरोनामुळेच होतो, असे नाही. जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंच आहे. एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला मरण नसतं”, अशी प्रतिक्रिया दिली (Udayanraje Bhosale on Corona).
“सध्या करोना हा विषय खूप मोठा करण्यात आला आहे. कोरोना कशातून होतो? कोणी म्हणतं चिकनमधून, कोणी म्हणतं मटणमधून तर कोणी म्हणतं भाज्यांमधून, मग खायचं काय? त्यापेक्षा खाऊन मरा”, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
हेही वाचा : माझं मत मी परखडपणे मांडत असतो, गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया
उदयनराजे यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली आहे. “उद्योगधंदे बंद असल्याने लोकांमध्ये उद्रेक झाला तर तो कसा थांबवणार?”, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. “कोरोनाबाबत आयुर्वेदिक उपचाराचा विचार शासनाने केला पाहिजे. याशिवाय गोवा राज्याप्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा हॉटेल व्यवसाय सुरु झाले पाहिजेत. केंद्र सरकारने कोरोनाच्या मुद्याबाबत तज्ज्ञांची मिटिंग का बोलावली नाही?”, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे मुद्दे मांडणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते कधी सातारला येत आहेत? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात उपस्थित होते. याबाबत विचारले असता, “मला दौऱ्याचे निरोप मिळत नाहीत”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भारत-चीन तणावाबाबत बोलताना “हा सगळा येड्यांचा बाजार आहे. देशात काय चाललंय? आता पूर्वीसारखं युद्ध राहिलं नाही. सगळा बटनावरचा खेळ आहे”, असं उदयनराजे म्हणाले.