वाराणसीः वाराणसी (Varanasi) येथील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणाची सुनावणी आजपासून जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानंतर हा खटला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. शृंगार गौरीसह इतर देवी-देवतांची पूजा करण्याचा अधिकार देत या मूर्ती आम्हाला देण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर ही सुनावणी होईल. खरं तर हा खटला याआधीच सिव्हिल जज (सिनियर डिव्हिजन) यांच्याकडे सुनावणी सुरु होती. मात्र खटल्यातील प्रतिवादी अंजुमन इंतेजामिया मशीद कमिटीने आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. शुक्रवारी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने हा खटला जिल्हा सत्र न्यायालयालयात चालण्याचा आदेश दिला. तसेच मशीद परिसरात ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जातोय, त्या ठिकाणी कुणालाही जाण्याची परवानगी नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलंग सापडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जस्टिस डी वाय चंद्रचूड, जस्टिस नरसिंग आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निर्देश दिले की, खालच्या कोर्टाने मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा. तसंच जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम राहणार आहे, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. या प्ररकणी आठ आठवड्यात सुनावणी घ्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहे.
शुक्रवारी सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट म्हणाले, आम्ही हे प्रकरणी जिल्हा न्यायालयावर सोडू शकतो. त्यांचा अनुभव 20-25 वर्षांचा आहे. प्रकरण कसे हाताळावे हे त्यांना माहिती आहे. तसेच कोर्टाने या प्रकरणी तीन सल्लेही दिले.
पहिला– कनिष्ठ न्यायालयाला मशीद समितीच्या अर्जाचा निपटारा करू द्यावा.
दुसरा– आमचा अंतरिम आदेश निपटारा होईपर्यंत जारी राहील.
तिसरा– प्रकरणाची गुंतागुंत आणि संवेदनशीलता पाहता, सुनावणी जिल्हा न्यायाधीशांकडे दिली जावी.
ज्ञानवापी मशीद प्रकरण चर्चेत येण्यापूर्वी याठिकाणी नमाजसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी फार नवह्ती. मात्र गेल्या काही दिवसांपासून जशी कोर्टात सुनावणी आणि मशीद परिसरात सर्वेक्षण सुरु आहे, तशी येथील भाविकांची गर्दी वाढत असल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी तर येथे मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी लोक जमले होते. या पार्श्वभूमीवर मशिदीच्या बाहेर पाचशे मीटर परिघात चौक्या बसवण्यात आल्या. प्रवेशद्वारावरही पोलीस तैनात करण्यात आले होते. शिवलिंग सापडल्याचा दावा ज्या ठिकाणी केला जातोय, तेथील परिसरालाही सीआरपीएफ जवानांनी संरक्षण दिले आहे.