वर्धा : छोट्या दुकानांचे एप्रिल महिन्याचे भाडे माफ करा (Wardha Corona Update), असा आदेश वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दुकानमालकांना दिला आहे. लॉकडाऊनमुळे मेडीकल आणि किराणा दुकानं वगळता जिल्ह्यातील बरीच दुकानं बंद होती. त्यामुळे बंद असलेली आणि अडीचशे चौरसफूट क्षेत्रात असलेल्या दुकानांचे भाडे माफ करावे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे (Wardha Corona Update).
वर्ध्यात मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावर घर घेऊन वास्तव्य करणारे नागरिक आहेत. बऱ्याच दिवसांपासून सर्वच व्यापार ठप्प असल्याने घरमालकांनी भाड्याकरिता भाडेकरुंना तगादा लावू नका, असादेखील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी घरमालकांना दिला आहे. सध्याच्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही घरमालकाने भाडेकरुंना घरभाडे आणि दुकानभाड्यासाठी तगादा लावल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिला आहे.
“घरमालकांनी भाडेकरुंकडून एक एप्रिलपासून पुढील तीन महिन्यांचे घरभाडे मागू नये. या कालावधीत भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरुला घरातून बाहेर काढू नये”, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, दुकानांच्या भाड्यात सूट देण्याचा आदेश काढणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
वर्ध्यात कोरोनाचा एकही रुगण नाही
दरम्यान, राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, वर्धा जिल्ह्यात मात्र प्रशासनाने कोरोनाला एण्ट्रीच करु दिलेली नाही. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनाने हे शक्य झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यात सर्वात पहिली कोरोना चाचणी वर्ध्यात झाली होती. आश्चर्य म्हणजे चीनच्या वुहान शहरातून वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठात पोहोचलेल्या 13 विद्यार्थिनींची त्यावेळी चाचणी घेण्यात आली होती.
सेवाग्राम, सावंगी आणि वर्धा शहरातील विदर्भातील नामवंत रुग्णालये कोरोनाच्या काळात वर्धेकरांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास आयसोलेशनसाठी लगेच राखीव करण्यात आले. रुग्णलयाच्या 200 खाटा आणि व्हेंटिलेटरचा पुरेसा साठा तयार ठेवण्यात आला.
वर्ध्यात काय काय तयारी?
– जिल्ह्यात दोन मोठे रुग्णालय सावंगी,सेवाग्राम तर जिल्हा सामान्य रुग्णालय,दोन उपजिल्हा रुग्णालय असे मिळून 200 आयसोलेशन बेडची व्यवस्था
– सेवाग्राम वैदकीय रुग्णालयात कोविडच्या पॉझेटीव्ह रुग्णासाठी स्पेशल 100 बेडची व्यवस्था
– वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 बेडची व्यवस्था
– जिल्ह्यात 87 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे
– वैद्यकीय अधिकारी यांचा विचार केला तर 50 डॉक्टर आहेत तर 110 नर्स सध्या आहेत. इतर डॉक्टर आणि नर्स यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू आहे
– मास्क,सॅनिटायझर्स, PPE किट सध्या उपलब्ध आहे
संबंधित बातमी :