पुणे : मराठा आंदोलनातील आंदोलकांवरील 80 टक्के केसेस मागे घेण्यात आल्या आहेत, उर्वरीत केसेसही लवकरच मागे घेतल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले?
“मराठा आंदोलनावरील 80 टक्के केसेस मागे घेण्यात आल्या आहेत. उर्वरीत केसेसही लवकरच मागे घेतल्या जातील. त्यासाठी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती पूर्ण केल्यावर केसेस मागे घेण्यात येतील.”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावरील कार्यक्रमातून दिले.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत की, “मराठा आंदोलनावरील 80 टक्के केसेस मागे घेण्यात आल्या आहेत.” मात्र, दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणत आहेत की, “मराठा क्रांती मोर्चावेळचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याची एक मोठी प्रक्रिया आहे.”
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
“संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यायला 10 वर्षे लागली आहेत. सकल मराठा क्रांती मोर्चा आणि भीमा कोरेगाव वेळी घातलेले गुन्हे हे सर्व मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहेच. मात्र गुन्हे मागे घेण्याची एक मोठी प्रक्रिया असते हे समजून घ्यावे.” असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगलीत व्यक्त केले होते.
“निवडणुका जवळ आल्या की गैरसमज पसरवले जातात. मात्र वस्तूस्थिती तशी नाही. सकल क्रांती मराठा मोर्चा वेळी दाखल केलेले गुन्हे 100 टक्के काढले जाणार आहेत.”, असेही चंद्रकांत पाटील सांगलीत म्हणाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देत आहेत खरे, पण प्रत्यक्षात गुन्हे कधी मागे घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.