औरंगाबादः मान्सून काळात मराठवाड्याला मोठ्या अतिवृष्टीचा सामना कराला लागला होता. आता थंडीतही अवकाळी पाऊस मराठवाड्यावर अवकृपा दाखवतोय. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाचा (Rain in Marathwada) फटका बसला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला सध्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, पाचोड, गंगापूर, वैजापूर आदी परिसरात वादळी वारा, पाऊस आणि कुठे कुठे तर गारपीटीनेच झोडपलं. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं . जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील इसारवाडी, धनगाव, वाहेगव, लोहगावमध्ये वादळी वाऱ्यासह 15 ते 20 मिनिटे जोरदार गारपीठ झाली. या भागात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गंगापूर शहर आणि परिसरात, तसेच वैजापूरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे नव्याने लागवड होत असलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. तसेच हरभरा, ज्वारीसह रबीच्या पिकांनाही फटका बसला.
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात तसेच तीर्थापूरी, वालसावंगी येथे मुसळधार पाऊस पडला. तीर्थापुरी येथे वीजा पडल्यानेही मोठे नुकसान झाले. नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. नांदेड जिल्ह्यात तर दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी मौसम केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बऱ्याच वेळा अशी अवकाळी स्थिती निर्माण होते. पण ही स्थिती फार काळ टिकणार नाही. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण असेच राहिल. 28 डिसेंबर रोजी कमाल तापमान 27 अंश सेल्सियस तर किमान तापमान 18 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. 29 आणि 30 डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. अशा वातावरणामुळे फळबागांना जास्त फटका बसू शकतो.
इतर बातम्या-