लोकसभेला मला शिर्डीची जागा दिली असती तर माझीही जागा निवडून आली असती आणि नगरमध्ये सुजय विखे यांची देखील जागा निवडून आली असती असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. विधानसभेच्या निवडणूकीसाठी आम्हाला सात ते आठ जागा मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे. आम्हाला जरी जागा मिळाल्या नाही तरी आम्ही स्वतंत्र न लढता महायुतीसोबत लढू असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज्यपाल नियुक्त सात विधान परिषद सदस्यांची निवड झाली आहे. उर्वरित पाच जागात आमच्या पक्षाला देखील संधी मिळावी अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम 60-70 टक्के पूर्ण झाले आहे. आम्ही मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे अशी मागणी केली होती. मात्र तो निर्णय होऊ शकलेला नाही. पुढच्या वेळी महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला मंत्रिपदाची संधी मिळावी. रिपाईला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला विधानसभेच्या 7 ते 8 जागा द्याव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. श्रीरामपूर, भुसावळ, देवळाली या राखीव जागांसाठी आम्ही आग्रही आहोत. महायुती विचार करेल अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
जागा दिल्या नाही तरी वेगळं लढण्याची आमची भूमिका नाही. तीन पक्षांकडे आमदारांची संख्या जास्त आहे.मात्र माझा पक्षही छोटा नाही. कार्यकर्त्यांच्याही काही भावना असतात. आमच्यामुळे युतीची महायुती झाली आहे. दोन मोठे पक्ष सोबत आल्याने RPI चे नाव घेतले जात नाही. मला कार्यक्रमांना मला बोलवू नका पण माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलवा. माझ्या पक्षाच्या माध्यमातून महायुतीला मते मिळतात. मला एकट्याला मंत्रिपद दिले म्हणजे रिपाईला काही द्यायचे नाही ही भूमिका चुकीची आहे असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.