जो बायडन यांच्या विजयाने भारत-अमेरिका संबंधात काय फरक पडणार?

| Updated on: Nov 08, 2020 | 1:00 AM

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US election Result 2020)  डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. या गोष्टीचा भारत-अमेरिका संबंधांवर काही परिणाम होतील का? असा सवाल अनेकांना पडला आहे.

जो बायडन यांच्या विजयाने भारत-अमेरिका संबंधात काय फरक पडणार?
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US election Result 2020)  डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री संपूर्ण जगाने पाहिली आहे. पंतप्रधान मोदी गेल्यावर्षी अमेरिकेत गेले होते तेव्हा ‘हाऊडी मोदी’ नावाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ट्रम्प भारतात आले होते. मोदींनीदेखील त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर भारत-अमेरिका संबंधावर काही परिणाम होईल का? असा सवाल अनेकांना पडला आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचे भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम होणार याबाबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना प्रश्न विचारला असता, या निवडणुकीच्या निकालाचा भारत-अमेरिका संबंधांवर फारसा फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली (US election Result 2020).

“डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असला किंवा जो बायडन विजयी झाले असले तरी भारत-अमेरिका संबंधांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण गेल्या दोन दशकांपासून भारत-अमेरिका संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे. मग राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचा असो किंवा डेमोक्रेटिक पक्षाचा असो, दोन्ही देशांमधील संबंधामध्ये प्रगती झाली आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

“अमेरिकेला आता तर भारताची फार मोठी गरज आहे. आर्थिक, सामाजिक अशा दोन्ही बाजूंनी अमेरिकेला भारताची गरज आहे. कारण अमेरिका आणि चीन यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. याशिवाय कोरोनामुळे ग्लोबल सप्लाय चैन डिस्टर्ब झाली आहे. त्यामुळे भारताचा पर्याय म्हणून विचार केला जात आहे”, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी दिली.

“चीनच्या विस्तारवादी धोरणाला नियंत्रित करणं हे जो बायडन यांचं प्रमुख उद्दीष्ट्य असणार आहे. त्यासाठी अमेरिकेला भारताशिवाय पर्याय नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे नेते बराक ओबामा यांनी चीनचं विस्तारवादी धोरण रोखण्यासाठी आशियात अमेरिकेचं सैन्य तैनात करण्याची योजना आखली होती. त्यामुळे बायडन यांनाही ती योजना पुढे घेऊन जावी लागणार नाही”, असं शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

‘त्या’ पराभवी राष्ट्राध्यक्षांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव, ट्रम्प ठरले पाचवे कमनशिबी अध्यक्ष