औरंगाबादः मराठवाड्यातील एकमेव सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात (Siddharth Garden Zoo) आता अस्वलांची जोडी आणली जाईल. हेमलकसा येथून ही अस्वलांची जोडी, इमू, तरस आणि लांडगा हे प्राणी येतील, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. औरंगाबाद महापालिकेतर्फे (Aurangabad Municipal corporation) यासाठीचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. हेमलकसा प्राणि संग्रहालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच वन विभागाची मंजुरी घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी (Saurabh Joshi) यांनी दिली. तसेच संग्रहालयात अजूनही काही प्राणी एकेकटे आहेत, त्यांच्यासाठीही जोडीदार मिळवून देण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात वाघांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी दोन वाघ पुणे येथे पाठवण्यात आले होते. तसेच पुरशी जागा नसल्याने येथील दोन हत्ती विशाखा पट्टणमला पाठवण्यात आले होते. प्राणी संग्रहालयातील जागा अपुरी पडत असल्याचे निरीक्षण केंद्र सरकारच्या समितीने नोंदवले होते. सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात सांबर आणि काळवीटांची संख्या जास्त आहे. हे प्राणी इतर प्राणी संग्रहालयांना देण्याची मनपाची तयारी आहे.
सिद्धार्थ गार्डनमध्ये 25 वर्षांपूर्वी वन विभागाने मदाऱ्याकडून जप्त केलेली अस्वलाची जोडी आणण्यात आली होती. त्यानंतर नवीन अस्वल आणले नाही. संग्रहालयात एकटा प्राणी न आणता आता प्राण्यांची जोडी आणणे आवश्यक आहे. हेमलकसा येथे अस्वलाची जोडी असल्याची माहिती मिळाल्याने ती मिळण्यासाठी महापालिकेचा पत्रव्यवहार सुरु आहे.
दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील जागा प्राण्यांसाठी अपुरी पडत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यादृष्टीने महापालिकेने मिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच प्राण्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
इतर बातम्या-