नवी दिल्ली – थंडीचे दिवस (winter) सुरू झाले आहेत. या ऋतूमध्ये बऱ्याच जणांना त्वचा कोरडी (dry skin) होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी बरेच लोक विविध सौंदर्य प्रसाधनांचा (beauty products) वापर करतात. मात्र त्यांचा प्रभाव बराच काळ रहात नाही. त्वचा मऊ रहावी यासाठी तुम्ही अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमकही मिळेल. तसेच खाज सुटणे, पुरळ येणे, अशा इतर समस्यांपासून मुक्तताही मिळेल.
कोरफड व ग्लिसरीनचा वापर करा
एका बाऊलमध्ये थोडं ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये सम प्रमाणात कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल घालावे. हे दोन्ही पदार्थ नीट एकत्र करावेत आणि चेहरा व मानेवर लावून मालिश करावे. हे मिश्रम चेहऱ्यावर साधारण अर्धा तास राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा व मान स्वच्छ धुवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा वापर करू शकता.
केळं व दूध
एका बाऊलमध्ये एक केळं घेऊन ते मॅश करावे, त्यामध्ये थोडे दूध घालावे. ते नीट एकत्र करून चेहरा, मान व गळ्यावर लावावे व मालिश करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर 20 ते 30 मिनिटे राहू द्यावे. थोड्या वेळाने साध्या पाण्याने चेहरा व मान धुवावी. या पॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.
शिया बटर आणि नारळ तेल
एका भांड्यात थोडं शिया बटर घेऊन ते वितळवा. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे नारळाचे तेल घालावे. हे दोन्ही पदार्थ एकमेकांमध्ये नीट मिसळेपर्यंत ते गरम करावे. मिश्रण गार झाल्यानंतर ते चेहरा व मानेला लावून मसाज करावा. ते त्वचेवर 15 ते 20 मिनिटे ठेवा. यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुवावी. आठवड्यातून 2-3 वेळा हे मिश्रण वापरावे.
दही व ओट्स
थोडे ओट्स घेऊन त्याची बारीक पूड करावी आणि ते एका बाऊलमध्ये ओतावे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे दही घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून चेहरा व मानेवर लावावे व हळूवार हाताने मालिश करावे. साधारण 15 ते 20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. या उपायांमुळे कोरड्या त्वचेचा त्रास कमी होण्यास मदत होईल व तुमची त्वचा मुलायम होईल.