आताच्या पिढीला फ्रिडम हवं आहे. लग्न नको असतं. कारण, लग्न केलं की बंधनं, जबाबदाऱ्या येतात. हा विचार तरुण मंडळींच्या मनात येतो. पण, या लग्नात आणि त्याहून नव्यानं बनणाऱ्या नात्यात आनंद, आपलेपणा आणि जिव्हाळा आहे. हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही एकटे राहिलात तर नात्यांचं महत्त्व कधीच कळणार नाही. लग्न हा प्रेमाने आणि आव्हानांनी भरलेला एक सुंदर जीवनप्रवास आहे. ज्यात आपण केवळ आपल्या जोडीदाराबरोबर राहतच नाही तर रोज काहीतरी नवीन शिकता. हे असे नाते आहे जे आनंद आणि जबाबदाऱ्या घेऊन येते, जिथून केवळ नवीन आयुष्यच सुरू होत नाही तर जीवन जगण्याची पद्धत देखील पूर्णपणे बदलते.
लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल होतात, पण त्याचा सर्वाधिक परिणाम घरातील सुनेवर होतो. कारण नवऱ्याला खूश ठेवण्याबरोबरच सासू-सासरे आणि वहिनी यांच्याशी घट्ट नातं निर्माण करण्याचा दबावही तिच्यावर असतो.
सुनेला यासाठी खूप संयम आणि धाडसाची गरज असते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या काळात छोट्या-छोट्या चुका आणि गैरसमजांमुळे नात्यात खटके उडतात. आता माणसं म्हणल्यावर थोडं फार होणारच. म्हणूनच असे म्हटले आहे की, लग्नाचे पहिले 6 महिने काढले तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे सर्वांचे स्वभाव देखील पहिल्या सहा महिन्यात कळतात.
लग्नानंतर कोणत्याही मुलीला आपलं घर आणि कुटुंब सोडणं सोपं नसतं, हे नाकारता येत नाही. पण आता तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तुम्ही एक नवीन कुटुंब तयार केलं आहे, जिथे मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत.
तुमच्या घरात जे घडत असतं, ते तिथेच सोडा. आता इथल्या म्हणजेच सासरच्या पद्धतींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. लग्नानंतर सासू-नणंद यांच्याशी नातं घट्ट ठेवायचं असेल तर दोन्ही कुटुंबांमध्ये तुलना करणं टाळा.
सासू-नणंद यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले नाही तर त्यांचे मन जिंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच शक्य होणार नाही. कारण संभाषण ही अशी गोष्ट आहे जी लग्न बनवू शकते आणि तोडू शकते. घरच्यांना काहीही बोलण्याआधी दोनदा विचार करावा लागला किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी व्यक्त करणं अवघड झालं तर या नात्यात दुरावा येणारच आहे.
तुम्हाला खरोखरच सासरच्या लोकांमध्ये आपलं स्थान बनवायचं असेल तर आधी त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आवडी-निवडी जाणून घेतल्यानंतर त्यानुसार वागल्याने नात्यात गोडवा येऊ शकतो. मात्र, कोणतेही नाते घट्ट करण्यासाठी एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जातात, असे आमचे मत आहे. पण सुरुवातीला त्यांच्या निवडीला प्राधान्य दिलं तर सासूबाई कौतुक करण्यात मागे राहणार नाहीत.
लग्नानंतर नव्या नात्यांचा पाया भक्कम करण्यासाठी घरातील छोट्या-छोट्या कामांमध्ये मदत करण्याची तयारी ठेवा. कुटुंबातील कुणाला तुमची गरज असेल तर त्यांच्या कामी या. कारण अनेक मुली लग्नानंतरच आपलं-आपलं काम करणं पसंत करतात, हा अतिशय चुकीचा मार्ग आहे. आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे. अशा वेळी आपण एकटे नाही, हे समजून घ्यायला हवे.