आपल्यापैकी बहुतांश लोक सकाळी लिंबूपाणी (lemon water) आणि मध (honey) सेवन करणे पसंत करतात. सकाळी उठल्यावर अंशपोटी लिंबूपाणी व मधाचे सेवन केल्याने केवळ वजन कमी (weight loss) होत नाही तर आपले शरीरही डिटॉक्स होते. लिंबू हे व्हिटॅमिन-सी चा उत्तम स्त्रोत आहे. तर मध हा आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो. लिंबू आणि मध या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरही असते. मात्र असे असले तरीही सर्व लोक लिंबूपाण्यासह मधाचे सेवन करू शकतात का असा प्रश्न उपस्थित होतो ? त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
काय आहे आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे ?
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नमूद केले आहे की लिंबूपाणी आणि मधाचे सेवन केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. मात्र असे असले तरीही लिंबू पाणी आणि मधाचा वापर सर्व लोक करू शकत नाहीत. लिंबू पाणी आणि मधाचे सेवन केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, असे बरेच जणांनी ऐकले असेल. मात्र हे खरोखर किती जणांनी करून पाहिले आणि किती लोकांना त्याचा फायदा मिळाला ?
आयुर्वेद तज्ज्ञांनी याच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे.
– लिंबू आणि मध आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी ( फॅट बर्न) करण्यास मदत करते.
– त्याचे सेवन केल्याने आपले लिव्हर (यकृत) डिटॉक्स होते.
– ब्लोटिंगच्या समस्येपासूनही मुक्ती मिळते.
या गोष्टी लक्षात ठेवा –
– लिंबूपाणी व मधाचे सेवन करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे की ते पाणी खूप गरम नसावे.
– मध नेहमी कोमट पाण्यात मिसळावा. जास्त गरम पाण्यात मध घातल्यास त्याचे विषात रुपांतर होऊ शकते.
– कोमट पाण्याच १ चमच्यापेक्षा अधिक मध मिसळू नये.
– हे पाणी सेवन करताना सुरुवातीला अर्धे लिबू वापरावे. ते योग्य वाटल्यास हळूहळू लिंबाचा वापर वाढवावा व एक लिंबाचा रस पाण्यात मिसळावा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
लिंबूपाणी व मधाचा वापर केव्हा टाळावा ?
तुम्हाला जर संधिवात, हायपरॲसिडिटी, कमकुवत अथवा ठिसूळ हाडं, तोंडातील अल्सर इत्यादी त्रास होत असेल तर तुम्ही लिंबूपाणी व मधाचे सेवन करणे टाळावे. अन्यथा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)