वाढते वय आणि खराब जीवनशैली यामुळे अनेक आजार (falling sick) होण्याचा धोका असतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, काही आजार अनुवांशिक देखील असतात. हार्ट ॲटॅक, कॅन्सर यांसारखे काही आजारही (diseases) जीन्समुळे होतात, असे म्हटले जाते. पण हे गंभीर आजार होण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे खराब जीवनशैली (bad lifestyle) असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून नमूद करण्यात आले आहे. यासोबतच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि राहण्याची पद्धत हेही आजारांना प्रोत्साहन देते.
सेंटर फॉर कम्प्यूटेशन बायोलॉजी च्या एका संशोधनातून असा खुलासा झाला आहे की, वयाच्या 50 व्या वर्षानंतर होणारे बहुतांश आजार हे खराब जीवनशैलीमुळे होतात. या वयानंतर अनुवांशिकतेमुळे आजार होण्याचा धोका कमी होतो. पण त्या व्यक्तीचा आहार कसा आहे, ती व्यक्ती कोणत्या वातावरणात राहते, हे सर्व घटक आजार होण्यामागचे एक मोठे कारण ठरू शकते. या संशोधनात शास्त्रज्ञांनी 1 हजार लोकांचा अभ्यास केला. ज्यामध्ये असं आढळून आलं की वाढत्या वयानुसार जीन्समुळे होणाऱ्या आजारांचा धोका खूप कमी असतो. पण ज्या व्यक्तींची जीवनशैली खराब आहे, ते लोक अनेक आजारांना बळी पडू शकतात.
हार्ट ॲटॅकचा धोका अधिक –
आजकाल अनेक लोकांना लहान वयातच हृदयविकाराचा झटका येत आहे. असे असले तरी लोकांची खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळ हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. आपण कोणते अन्न खातो, काय जेवतो, या सर्वांचा परिणामही आपल्या हृदयाच्या कार्यावर होत असतो. अन्न पदार्थांमध्ये फॅट्सचे (चरबी) प्रमाण जास्त असल्यानेही हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय खराब जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या धोकादायक आजार होऊ शकतो.
मधुमेहाचाही धोका –
जसजसं वय वाढतं तसा टाइप-2 मधुमेहाचा धोकाही वाढतो. अनेक वेळा मधुमेह हा अनुवांशिकही असतो, पण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली बिघडल्यामुळे हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. या संशोधनात असेही म्हटले आहे की, वयाच्या 50 व्या वर्षानंतर अल्झायमर आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याचा धोकाही खूप जास्त असतो.
अशी ठेवा जीवनशैली –
– झोपेचा पॅटर्न योग्य ठेवावा, रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे.
– जेवणामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी ठेवावे आणि प्रोटीन व व्हिटॅमिन्सचे सेवन जरूर करावे.
– दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा.
– सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करावे.
– दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे.