आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण योग्य आहारासोबतच व्यायाम व योगा देखील नित्य नियमाने करत असतो. यासोबत बदलत्या हवामानात आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण घरगुती उपायांचा अवलंब करतो. कारण कोणत्याही घरगुती उपायांच्या मदतीने अनेकांना समस्यांपासून बराच आराम मिळतो. घरगुती उपायांमध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचे सेवन करतात. यामध्ये तुळशीच्या पानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
आपल्या सगळ्यांना तुळशीच्या पानांचे महत्व माहीतच आहे. तुळशीची पाने औषधी गुणधर्मांमुळेही खूप प्रसिद्ध आहे. यात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीवायरल गुणधर्म आणि अनेक पोषक घटक असतात. अशावेळी अनेक जण तुळशीच्या पानांचे सेवन करतात. अनेकांना तुळशीची पाने चहामध्ये टाकून चहा प्यायला आवडतो. तर अनेक जण सकाळी रिकाम्या पोटी पाने चावून खातात. परंतु तुळशीच्या पानांसोबत काळी मिरीचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते.
तुळस आणि काळी मिरी यांचे एकत्रित सेवन केल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय ज्यांना सर्दी, घसा खवखवणे आणि सिझनल फ्लू सारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी या दोघांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. हे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. काळी मिरीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सूज येण्यास किंवा जखमा भरण्यास उपयुक्त ठरतात.
आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की, तुळस आणि काळी मिरी एकत्र खाल्ल्याने सर्दी, कफ, खोकला आणि श्वसनाचे आजार दूर होण्यास मदत होते. त्यासोबत रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. ज्यामुळे हंगामी आजार देखील टाळता येतात. त्यासोबत याचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहण्यास मदत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
– तुळस आणि काळी मिरीचे एकत्र सेवन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. यासाठी तुळशीची काही स्वच्छ पाने आणि काळी मिरी घेऊन पाण्यात ५ मिनिटे उकळून घ्या. आता हे पाणी गाळून घेऊन तुम्ही यांचे सेवन करू शकता आणि यात तुम्हाला चव वाढविण्यासाठी मध देखील घालू शकता.
– तुम्ही काळी मिरी आणि तुळशीच्या पानांचा चहा बनवून ही सेवन करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी उकळून त्यात तुळशीची पाने, काळी मिरी व किसलेले आले घालून ५ ते ७ मिनिटे उकळावे. यात तुमच्या सोयीनुसार चव वाढविण्यासाठी गूळ किंवा मध तसेच लिंबाचा रसाचे २ ते ३ थेंब घालू शकता.
– तुळशीची पाने आणि काळी मिरी खाण्याचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे तुळशीच्या पानांचा रस आणि काळी मिरी पावडर एकत्र मिसळा. यानंतर तुम्ही त्यात मध घालून एक चमचा इतके सेवन करू शकता. हे शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास देखील मदत करतात.
पण हे लक्षात ठेवा की ज्या लोकांना या गोष्टींची ॲलर्जी आहे त्यांनी याचे सेवन करणे टाळावे. याशिवाय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या गोष्टींचे सेवन करावे.