मुंबई : प्रत्येकाला आपली त्वचा (Skin) सुंदर आणि तजेलदार हवी असते. यासाठी आपण अनेक उपाय देखील करतो. चमकदार त्वचेसाठी लोक विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतात. या उत्पादनांमध्ये रसायने असतात. यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. सौंदर्य उत्पादने (Beauty products) वापरण्यापेक्षा आपण त्वचेला खोल पोषण आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला हवा. हे पदार्थ भरपूर प्रमाणात पोषक असतात. ते त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर (Problem) मात करण्यास मदत करतात, निरोगी त्वचेसाठी तुम्ही फळे आणि भाज्यांपासून बनवलेले रस देखील आहारात समाविष्ट करू शकता. यामुळे फक्त तुमची त्वचाच चमकदार राहण्यास मदत होत नाहीतर हे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरते.
टोमॅटो हे त्वचा आणि आरोग्य दोन्हींसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने त्वचा तरूण दिसते. इतकेच नाहीतर टोमॅटो त्वचेला लावले तरीही टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला आपली त्वचा चमकदार आणि सुंदर हवी असेल तर दिवसातून एकदातरी टोमॅटोचे सेवन नक्कीच करा.
डाळिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबाच्या रसाने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि त्वचा चमकदार राहते. हे त्वचेला पोषक देते आणि सुंदर बनवते. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. म्हणून नियमितपणे एक ग्लास डाळिंबाचा रस प्या. मात्र, हे नेहमीच लक्षात असूद्या की, रस हा कधीही ताजा असतानाच प्या. आपण डाळिंबाच्या रसामध्ये एक लिंबू देखील टाकायला हवे. यामुळे तो रस अधिकच निरोगी बनतो.
हिरव्या पालेभाज्यांचा रस अतिशय चविष्ट तसेच आरोग्यदायी असतो. पालकाचा रस त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करतो. पालकाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन के असते. या रसामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि मॅंगनीज असतात. ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात. तसेच पालकाचा रस दररोज प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचा रस आपण चेहऱ्याला देखील लावू शकता.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरफड ही आपल्या डोळ्यांसाठी, आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडच्या मदतीने आपण त्वचेच्या असंख्या समस्या दूर करू शकतो. तसेच ज्यांना केसांच्या काही समस्या आहेत, अशांसाठी देखील कोरफड फायदेशीर ठरते. कोरफडमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होते. यामुळे आपण किमान आठ दिवसातून एकदा तरी कोरफडच्या रसाचे नक्कीच सेवन करायला हवे. यामुळे आरोग्य, त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होतात.