मुंबई : ‘आपके पैर जमीन पर मत रखिए, मैले हो जाएंगे’, पाकिजा चित्रपटातला हा डायलॉग ऐकायल खूप छान वाटतो. प्रत्यक्षात मात्र असं करणं कठीणच. कारण आपला निम्मा कार्यभार हे पायच सांभाळत असतात. मात्र याचा पायांच्या भेगांमुळे (Cracked Heels),त्यातून रक्त येण्याच्या समस्येमुळे खूप हैराण व्हायला होतं. पायांना भेगा पडण्याची अनेक कारणं असू शकतात. वाढत्या वजनामुळे पायावर दाब पडणं, ब-याच वेळेसाठी उभं राहून काम करणं, कोरडी त्वचा (dry skin),खुल्या चपला किंवा सॅंडल्स घालणं अशा अनेक बाबींमुळे पायाला भेगा पडू शकतात. पायाची योग्य रितीने काळजी न घेतल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. दरवेळेस पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करणं शक्य होत नाही. तरीही आपण घरी काही सोपे, घरगुती उपाय (home remedies) करूनही भेगांच्या समस्येवर सहज मात करू शकतो.
पायांच्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे नीट स्वच्छता राखणे. भेगांमध्ये अनेक वेळेस माती, धुलीकण अडकते व पायांना आणखी त्रास होते. त्यामुळे भेगा वेळच्यावेळी, नीट स्वच्छ केल्या पाहिजेत. त्यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात सैंधव मीठ आणि थोडा शांपू घाला. हे मिश्रण नीट मिसळून त्यात पाय थोडा वेळ बुडवून ठेवा. नंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा. यामुळे पाय स्वच्छ होतात, त्यातील घाण आणि मृत पेशीही निघून जातात.
मध आणि दूध जितकं आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त तितकंच आपल्या पायांसाठीही फायदेशीर असतं. मधामुळे त्वचेचं पोषण होतं. एका भांड्यात मध आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. त्यानंतर त्यामध्ये संत्र्याचा रस मिसळा. गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या. तयार झालेले हे क्रीम एका डबीत भरून ठेवा. हे क्रीम रोज पायाच्या भेगांना लावून हळुवारपणे मालिश करा. थोड्याच दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
भेगांपासून आराम मिळवायचा असेल तर पायांना नियमितपणे मॉईश्चरायजर लावणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी पायांना मॉईश्चरायजर लावावे. पायांसाठी नारळाचे तेल खूप उपयोगी असते. रात्री झोपण्यापूर्वी पायांना नारळाच्या तेलाने मसाज करा. त्यामुळे पायांच्या भेगा तर कमी होतीलच पण पाय मऊही होतील.
पायाच्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा वापरही करू शकता. ग्लिसरीन शरीरात मॉईश्चर टिकवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाला जिथे भेग पडली असेल तिथे ग्लिसरीन लावा. त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही मिसळू शकता. यामुळे मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.