वाढत्या प्रदूषणामुळे आणि धुळीमुळे आपल्या चेहऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण दुकानातल्या महाग क्रीम आणि लोशन विकत घेतो. पण बऱ्याचदा आपल्याला त्याचा काही फायदा देखील होत नाही. त्यापेक्षा आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून आपल्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो आणि त्याचा फायदा आपल्या त्वचेला देखील होतो. पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
टमाट्यामध्ये लाइकोपिन नावाचे तत्व भरपूर प्रमाणात असते. लाइकोपिन त्वचेचे सर्व डाग आणि मृत पेशी काढून टाकते. यामुळे त्वचा चमकदार आणि गोरी होते. टोमॅटो चेहऱ्याला लावण्यासाठी एक ते दोन टमाटे घेऊन ते एका ब्लेंडर मध्ये टाका आणि त्यासोबतच दोन चमचे लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून वीस मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
कोरफडीचा गर घेऊन त्यात थोडे बदामाची पावडर घालून एक मिश्रण तयार करून घ्यायचे. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 15 ते 30 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. कोरफडीचा गर त्वचा गोरी करण्यासाठी तसेच त्वचा संबंधी समस्यांवर गुणकारी आहे. चेहऱ्यावरील घाण आणि ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बदाम पावडर फायदेशीर आहे.
दह्यात मध आणि लिंबाचा रस टाकून एक मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावून पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्याला मसाज करा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. चेहऱ्याला मध बाहेरून आणि आतून सुंदर बनवतो. लिंबाचा रस आणि दह्यात व्हिटॅमिन सी असते जे त्वचा चमकदार आणि गोरी बनवण्यास मदत करतात.
गुलाब जल मध्ये असलेले घटक त्वचेला आतून आणि बाहेरून स्वच्छ करतात त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. गुलाब जल मध्ये कच्चे दूध टाकून रात्री लावल्यास त्वचा उजळ आणि चमकदार होते. त्यासोबतच मुलतानी माती गुलाब जल मध्ये मिसळून लावल्यास त्याचे देखील चांगले परिणाम होतात.
नारळ पाण्याचे अनेक फायदे आहेत. त्वचा आतून सुंदर बनवण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. दिवसातून दोनदा नारळ पाण्याने चेहरा धुतल्या चेहऱ्याचा रंग उजळ होतो आणि त्वचा चमकदार होते.