मुंबई : उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटंले की, आंब्याचा रस, मस्तानी, मॅंगोच्या विविध डिश तयार केल्या जातात. जवळपास सर्वांनाच आंबे खायला प्रचंड आवडते. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आंबा हे सहज मिळणारे फळ आहे. लहान मुलांना तर आंब्याचा शेक प्रचंड प्यायला आवडतो. दुपारच्या वेळी आंबे खाण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, आंबा (Mango) हे असे फळ आहे, जे आपण कधीही खाऊ शकतो. आंबा हा फक्त आरोग्यासाठी चांगला नसून हा आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. आपण सर्वजण आंबा खातो आणि आंब्याचे साल मात्र फेकून देतो. पण असे न करता आपण आंब्याच्या सालपासून अनेक फेसपॅक (Facepack) तयार करू शकतो. विशेष म्हणजे आंब्याची साल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
चेहऱ्यावर येणारी धूळ यामुळे छिद्र बंद होतात. अशा स्थितीत चेहऱ्यावर मुरूमाची समस्या सुरू होते. मात्र, ही समस्या दूर करण्यासाठी आंब्याची साल खूप जास्त फायदेशीर ठरते. यासाठी आंब्याची साल फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर ती बाहेर काढून चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर जाण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्हाला आंब्याची साल आणि मध पॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. यासाठी आंब्याची साल घेऊन त्यावर थोडा मध टाका. यानंतर याची बारिक पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हळूहळू आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात त्वचेवर टॅन होतो. टॅनची समस्या दूर करण्यासाठी आंब्याची साल फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही आंब्याच्या सालीचा पॅक लावू शकता. आंब्याची साल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये दही मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आता आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. आंब्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला आतून दुरुस्त करण्याचे काम करतात.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)