थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात थंडावा असल्याने आपल्या सर्वांची त्वचा अधिक कोरडी होते. यामुळे त्वचेशी संबंधित सर्व समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत आजही अनेकजण संभ्रमात असतात. हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तर यावेळी दिल्लीचे श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, वरिष्ठ सल्लागार, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की, हिवाळ्यात थंड वारे वाहत असल्याने आणि वातावरणात ओलावा नसल्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळी ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे त्यांनी हिवाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी. तर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून काही सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल, ज्यामुळे हिवाळ्यात तुमच्या कोरड्या त्वचेचे आरोग्य सुधारेल.
हिवाळाच्या दिवसात तुम्हाला कोरड्या त्वचेपासून आराम मिळावा यासाठी एका स्प्रे च्या बाटलीत गुलाबपाणी घेऊन त्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळून चेहऱ्यावर स्प्रे केल्यास किंवा कापसाने चेहऱ्यावर लावल्यानेही त्वचेला झटपट ओलावा मिळतो. तसेच तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर हिवाळ्यात चेहरा जास्त स्क्रब करू नका. तसेच हिवाळ्यात हलका सूर्यप्रकाशही देखील तुमची त्वचा कोरडी करू शकतो. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. हिवाळ्यात त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यावे. या उपायांचा अवलंब करून तुम्ही हिवाळ्यात तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवू शकता आणि त्वचेला निरोगी व चमकदार ठेवू शकता.
हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठीही कोरफड जेल उत्तम आहे. कोरड्या त्वचेपासून आराम मिळावा यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला कोरफड जेल लावा आणि सकाळी चेहरा धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट होते. तसेच तज्ज्ञांच्या मते, कच्च्या दुधात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
तुमची त्वचा सुद्धा हिवाळ्यात कोरडी पडत असेल तर दिवसातून 1 ते 2 वेळा मॉइश्चरायझर नियमित लावावे. यासाठी तुम्ही शिया बटर, ग्लिसरीन किंवा हायल्युरोनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर निवडा. हे घटक असलेले मॉइश्चरायझर त्वचेचे सखोल पोषण करून त्वचा चांगली ठेवतात. तसेच झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलके गरम नारळ किंवा बदामाचे तेल लावावे. यामुळे त्वचेला ओलावा आणि नैसर्गिक चमक मिळते.