मुंबई | 24 जानेवारी 2023 : सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तरुणी अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिला ज्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात, त्यांची मार्केटिंग देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. आपला प्रॉडक्ट अनेकांना आवडवा आणि प्रॉडक्टची मागणी वाढावी यासाठी मजबूत मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणं तितकंच महत्त्वाचं असतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उद्योजक अनेक नवीन ऑफर बाजारात आणतात. महागड्या प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट देखील देतात. पण चीनमध्ये तर एका क्लिनिकने मुलींना विचित्र ऑफर दिली आहे. चीन येथील क्लिनिकने महिलांना आकर्षित करण्यासाठी अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजी अवलंबल्या की सगळेच थक्क झाले.
मुलींना विचित्र ऑफर देणारे क्लिनिक आता वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. एवढंच नाही तर, क्लिनिकला दंड देखील ठोठावण्यात आला आहे. शंघाई येथील कंपनी ‘जीन ब्यूटी बायोजेनेटिक इंजीनियरिंग कॉरपोरेशन लिमिटेड’ ने महिलांना आकर्षित करण्यासाठी विचित्र ऑफर दिली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
‘जीन ब्यूटी बायोजेनेटिक इंजीनियरिंग कॉरपोरेशन लिमिटेड’ कंपनीने दावा केला आहे की, महिलांनी खास प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर त्यांच्या सौंदर्येत भर पडेल. एवढंच नाही तर, महिलांच्या सौंदर्येवर घायाळ होत अनेक श्रीमंत व्यक्ती त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतील. यासाठी क्लिनिकने मोठी रक्कम देखील आकारली.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, शंघाई येथील कंपनी महिलांना कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियावर विचित्र जाहिराती वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2021 पासून कंपनी अशा प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा वापर करत आहे. अशा विचित्र ऑफरमुळे क्लिनिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
महिलांना विचित्र ऑफर देवून आकर्षित करणाऱ्या कंपनीच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी कंपनीला खोटी आश्वासने देऊन, सामाजिक नैतिकता मोडणे आणि जाहिरात कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. कंपनीला आता 30 हजार युआन म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार आहेत.