हात थरथरण्याची समस्या ही कोणालाही आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. चहाचा कप धरताना किंवा कुठलीही दुसरी गोष्ट उचलताना किंवा ठेवतांना अनेक जणांचा हात थरथरायला लागतो. नीट झोप न लागणे, जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन, मद्यपान, अति थकवा ही यामागची कारणे असू शकतात. याव्यतिरिक्त पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. ज्यामुळे हात थरथरण्याची समस्या उद्भवू शकते. न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे देखील हात थरथरतात. ज्यामध्ये हात विनाकारण वेगाने हळू लागतात. असे तुमच्या सोबत देखील घडत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. जर अशक्तपणामुळे तुमचे हात थरथरत असतील तर काही घरगुती गोष्टींचे सेवन केल्याने तुमचा अशक्तपणा दूर होईल. तुम्ही लाडू बनवून त्याचे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होईल आणि हात थरथरण्याची समस्या कमी होईल.
अशक्तपणा दूर करण्यासाठी पौष्टिकतेने भरपूर गोष्टी खाणे आवश्यक आहे. परंतु दररोज वेगवेगळे पदार्थ खाणे शक्य नाही म्हणून तुम्ही लाडू बनवू शकतात. त्यामुळे तुम्हाला अनेक घटकांचे पोषण सहज मिळेल. हे लाडू कसे बनवायचे ते जाणून घेऊ.
लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम काही बदाम, मखाना आणि फुटाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. त्यानंतर गॅसवर तवा ठेवा आणि त्यात गावरान तूप टाकून गरम होऊ द्या. आता त्यामध्ये उरलेले बदाम चिरून त्या तळून घ्या यानंतर डिंक तळून घ्या त्यामुळे डिंक फुगेल आणि कुरकुरीत होईल. डिंक फुगल्यानंतर काढा आणि मग मिक्सरमध्ये असलेले फुटाणे आणि बदामाचे मिश्रण तुपात तळून घ्या आणि त्याचा सुगंध येईपर्यंत ढवळत रहा. यानंतर डिंक मिक्सरमध्ये टाकून बारीक करा आणि उर्वरित मिश्रणामध्ये मिक्स करा. यासोबतच तयार मिश्रणामध्ये वेलची पावडर आणि उरलेले बदाम टाका. आता गुळाचे छोटे तुकडे करून कढईत टाका आणि थोडे पाणी घालून गुळ वितळू द्या. गुळ संपूर्ण वितळल्यानंतर तो मिश्रणामध्ये टाका आणि हे मिश्रण एकत्र करून थोडे कोमट झाल्यावर लगेच लाडू बांधून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू बांधले जाणार नाहीत.
रोज एक ग्लास दुधासोबत एक लाडू खाणे पुरेसे आहे. रोज लाडू खाल्ल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा जाणवू लागेल. त्या सोबतच सर्दी पासूनही तुमचे संरक्षण होईल. तयार लाडू तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता. हे लाडू महिनाभर तुम्ही साठवून ठेवू शकता.