मुंबई : पालकत्वाची (parenting) भावना ही खूप खास असतेच शिवाय त्यासोबत नवीन जबाबदारीही वाढत असते. जबाबदारी आली म्हणजे, तिला योग्यरित्या पार पाडणे खूप महत्वाचे असते. पहिल्यांदाच पालकत्वचा (first time parenting) अनुभव हा काही वेगळाच असतो. परंतु त्यासोबत मनात काहीशी धाकधूकदेखील असते. आपण पालक तर झालो परंतु त्याला योग्य न्याय देउ की नाही? ही भिती मनात असतेच. पालक होणे सोपे नसते. आपले अपत्य या जगात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर काही वर्षे पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य माहितीअभावी अनेक चुका होण्याची शक्यताही असते. जे पहिल्यांदा पालक बनतात त्यांना नवजात बाळाचा (newborn baby) आहार, पोषण आणि स्वच्छता याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते, किंबहुना काही वेळा अनुभवाअभावी बहुतांश पालक रडवेलेही होतात.
स्तनपानाची विशेष काळजी घ्यावी
पहिल्यांदाच आई झाल्या असाल तर स्तनपानाबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे असते. स्तनपान पहिल्यांदाच करत असल्याने अनेक मातांना ते करण्यात अडचणी निर्माण होत असतात. लहान मुलांना दुध ओढण्याची सवय नसल्याने पहिल्यांदा मातांना स्वत: दाबून दुध बाहेर काढून नवजात बालकाला स्तनपान करावे लागत असते. शिवाय यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत करुनच बाळाला स्तनपान करावे. घरी आल्यानंतर झोपून बाळाला दूध कधीही पाजू नये, यातून बाळाला नीट दुध पिण्यास अडचण निर्माण होत असते.
गरम पाण्याचा शेक
मातृत्वात स्तनामध्ये दूध निर्मितीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु होत असते. जर बाळाने दुध नीट पिले नाही तर, स्तनांना सूज येणे, दुधाच्या गाठी निर्माण होणे, यातून वेदणांचा त्रास सहन करावा लागत असतो. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती आणखी बिघडली तर दुधाच्या कमतरतेचीही समस्या निर्माण होते. यासाठी कोमट पाण्याने शेक घ्यावा तसेच घरगुती उपाय म्हणून जिरे किंवा ओव्याचे पाणी पिऊ शकता.
काचेच्या बाटलीचा वापर
मुलाने पहिले 6 महिने फक्त आईचे दूध प्यावे, असे सांगितले जाते. यानंतर, जर तुम्हाला त्याला बाटलीने दुध पाजायचे असेल तर नेहमी काजेच्या बाटलीचाच वापर दुध पाजण्यासाठी करावा, प्लास्टिकच्या बाटलीतील जंतू जास्त काळ टिकतात आणि ते मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक असते.
मसाज करताना काळजी घ्या
नवजात मुलांचे अवयव अत्यंत नाजूक असतात. अनेकदा घरातील जेष्ठांना मुलांची मसाज करण्यास सांगितले जात असते. मसाज करीत असताना ती हलक्या हाताने करणे आवश्यक असते. मुलांचे अवयव जास्त ताणू नये, किंवा त्यावर जास्त दाबही देउ नये. मसाज रोज हलक्या हाताने केल्यास हाडे मजबूत होतात, त्याचप्रमाणे वजनही झपाट्याने वाढते.
संबंधित बातम्या