मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतात ह्रदयविकाराच्या (Heart Disease) रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. फास्टफूड, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनपध्दती यासोबतच यामुळे कोलेस्ट्रॉलची (cholesterol) होणारी वाढ आदी कारणे ह्रदयविकारासाठी कारणीभूत ठरताना दिसत आहेत. उच्च कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे (Symptoms) कधीही दुर्लक्ष करू नये. कोलेस्टेरॉल हा एक फॅटी पदार्थ आहे, जो आपल्या यकृताद्वारे तयार होतो. तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. चांगला कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल आणि खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. एचडीएल हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी कार्य करते. पण एलडीएलमुळे हृदयाचे आजार होतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ‘प्लाक’ तयार होउन अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. सामान्यत: लोकांना ‘एलडीएल’ची म्हणजे खराब कोलेस्ट्रॉलच्या वाढीची लक्षणे समजत नाहीत. म्हणून या लेखात आपण कोलेस्टेरॉल वाढीची काही लक्षणे बघणार आहोत.
जर तुमचा रक्तदाब सामान्य असताना अचानक काही काळापासून सतत वाढू लागला असेल, तर तुम्ही सतर्क राहायला हवे. रक्तदाब वाढणे हेदेखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण आहे. त्यामुळे ताबडतोब कोलेस्टेरॉलची चाचणी करुन त्याची पातळी जाणून घ्यावी.
कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, त्यामुळे त्या अरुंद होतात. अशा स्थितीत हृदयाला रक्ताभिसरण प्रक्रिया करण्यास खूप अवघड जाते. यामुळे अनेकवेळा श्वास घेण्यास त्रास होतो, तसेच छातीत दुखते.
जर तुम्हाला हात, पाय किंवा त्वचेवर इतर कोणत्याही ठिकाणी केशरी, पिवळे चट्टे दिसले तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब स्वतःची चाचणी करुन घ्यावी
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांभोवती पिवळे पुरळ दिसत असतील तर याकडेही दुर्लक्ष करु नका. हे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षण असू शकते. त्वरित कोलेस्टेरॉलची चाचणी करुन तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
जेव्हा तुमच्या पायांच्या धमन्या ब्लॉक होतात तेव्हा पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्त पायापर्यंत पोहोचत नाही. यामुळे पाय दुखणे, सूज येणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात. हेदेखील वाढत्या कोलेस्टेरॉलच एक लक्षण आहे.
संबंधित बातम्या