आज जागतिक टॉयलेट दिवस आहे. दरवर्षी 19 नोव्हेंबरला जगभरात टॉयलेट डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे एक खास उद्देश आहे. लोकांनी शौचासाठी उघड्यावर जाऊ नये, त्यांना शौचालयाचं महत्त्व कळावं. शौचालयामध्ये स्वच्छता कशी राखावी याबाबत माहिती मिळावी, स्वच्छतेचं महत्त्व पटावं यासाठी जगभरात दरवर्षी 19 नोव्हेंबरला जागतिक टॉयलेट दिवस साजरा करण्यात येतो.टॉयलेट ही एक अशी जागा असते, जिथे दिवसभरात व्यक्ती कमीत कमी चार ते पाच वेळा जातोच. शाळा, कॉलेज, ऑफीस, घर अशा सर्व ठिकाणी टॉयलेटची सुविधा असते.
मात्र टॉयलेट वापरत असताना त्याच्या स्वच्छतेची देखील मोठी काळजी घ्यावी लागते. कारण कमोडच्या पुष्ठभागावर हजारो प्रकारचे खतरनाक किटाणू असतात, ज्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. त्यामुळे टॉयलेटच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते.तुम्ही घरी वापरत असलेलं टॉयलेट हे आठवड्यातून दोनदा आणि ऑफीस किंवा शाळा महाविद्यालय अशा संस्थांमध्ये असलेल्या टॉयलेटची दररोज स्वच्छता करणं आवश्यक असतं.त्यामुळे आजार पसरण्याचा धोका कमी होतो.
रोगांचा प्रसार
जर तुमचं टॉयलेट अस्वच्छ असेल, त्यावर पिवळे डाग असतील, दुर्गंध येत असेल तर वेळीच सावध व्हा कारण अशा टॉयलेटमुळे तुम्ही आजारी पडू शकता, कारण इथे हजारो प्रकारचे विषाणू असू शकतात.अस्वच्छ टॉयलेटचा वापर केल्यानं अनेकांना मूत्र संसर्गासारख्या गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो. त्याचसोबत डायरिया स्किन अॅलर्जीसारखे रोग देखील होऊ शकतात.
टॉयलेटची स्वच्छता
टॉयलेट कोणतही असून द्या भारतीय पद्धतीचं किंवा पाश्चात्य पद्धतीचं आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा स्वच्छ करणं गरजेचं असतं. जर तुमच्या टॉयलेटमध्ये असणारे पिवळे डाग निघत नसतील तर हा एक सोपा उपाय करून बघा.त्यासाठी तुम्हाला एक डेंचर टॅबलेटची (दात दुखीसाठी वापरात येणारी गोळी) आवश्यकता आहे.ती जर एक्सपायर झाली असेल तरी चालेल, किंवा तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही मेडिकलमधून देखील खरेदी करू शकता.ही टॅबलेट तुम्ही तुमच्या कमोडमध्ये टाका, त्यानंतर वीस मिनिटांनी फ्लश करा. तुमचं कमोड एकदम चकाचक होईल, आणि सर्व किटाणू देखील नष्ट होतील.