मुंबई : भारतात (India) विविध संस्कृती आणि परंपरा एकत्र नांदतात. प्रत्येक ठिकाणची बोलीभाषा, राहणीमान, खानपानाची पद्धत वेगवेगळी आहे. अश्या या विविधतेने नटलेल्या देशाची खाद्यसंस्कृतीही अफाट आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतात. भारताची खरी ओळख इथल्या स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये आहे. रस्तावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांना विशेष मागणी आणि प्रसिद्धी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणाऱ्या स्ट्रीट फुडला (Street food) तिथल्या स्थानिक चवीचा वारसा आहे. जर तुम्हाला रस्त्यावरील खाद्यपदार्थ खायचे शौकीन असाल तर देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणारे हे पदार्थ तुम्हाला माहिती असायलाच हवेत. चल तर मग देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणाऱ्या पदार्थांविषयी जाणून घेऊयात…
मुंबई- मायानगरी मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथल्या पर्यटनासोबतच इथले स्थानिक पदार्थही तितकेच चविष्ट आहेत. मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो वडापाव! वडापावसोबतच मिसळ पाव, कच्ची दाबेली, भेळ, पाणीपुरी, चिकन- मासे, ओला बोंबिल, असे अनेक पदार्थ मुंबईची ओळख आहेत.
दिल्ली- दिल्ली रस्त्यावरील खाद्यपदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पराठावाली गलीच्या पराठ्यांपासून ते मोमोजपासून ते छोले भटुरे ते गोल गप्पे आणि चाटपर्यंत अनेक पदार्थ दिल्लीची शान आहेत.
हैदराबाद- हैदराबादची बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे.जर तुम्हाला बिर्याणी आवडत असेल तर एकदातरी हैदराबादची बिर्याणी ट्राय करायलाच हवी.
कोलकाता- कोलकात्याच्या रसगुल्ला जगप्रसिद्ध आहे. जर तुम्हाला मिठाई खाण्याचे शौकीन असेल तर तुम्ही इथे काही प्रसिद्ध मिठाई जरूर ट्राय करा. त्यात मिष्टी दोई, रसमलाई, बाबू सोंदेश आणि रसगुल्ला इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही इथे काठी रोल्सचाही आनंद घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही काठी रोल खाऊ शकता. शिवाय इथे मासेही आवडीने खाल्ले जातात.
जयपूर- जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर जयपूर हे एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर इमारती पाहण्याबरोबरच तुम्ही येथे विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचाही आस्वाद घेऊ शकता. दाल-बाटी-चुरमा, लाल मास, कीमा बाटी, घेवर, कुल्फी आणि कचोरी या सारखे पदार्थ जयपूरमध्ये आवडीने खाल्ले जातात.
इंदौर- हे शहर स्वच्छतेसाठी ओळखले जाते. याशिवाय तुम्ही येथे अनेक उत्कृष्ट स्ट्रीट फूड्सचा आनंद घेऊ शकता. इथं पोहे, जिलेबी, पाणीपुरी, दही भेळ, दाल कचोरी आणि हॉट डॉगचा आनंद घेता येतो.
संबंधित बातम्या