व्हॅलेंटाइन डे जवळ येतोय. हा दिवस प्रेमी युगुलांसाठी खूपच खास असतो. खरं तर 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा हा दिवस महिना सुरु झाला रे झाला की लगेच चर्चेत असतो. यामागे बरीच कारणं असतात. आपल्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचं, प्रेमाचा हा दिवस कसा साजरा करायचा अशी अनेक कारणं यात येतात. आता व्हॅलेंटाइन डे निमित्त थायलंड प्रचंड चर्चेत आलंय. थायलंड व्हॅलेंटाइन डे निमित्त देशातील तब्बल 10 करोड लोकांना कंडोम देणार आहे. यामागे किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक आजारांपासून बचाव, सुरक्षित सेक्स, सामाजिक स्वास्थ्य अशी अनेक कारणं आहेत.
थायलंडने सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी व्हॅलेंटाइन डेपूर्वी 95 दशलक्षाहून अधिक कंडोम देण्याची योजना आखली आहे. सिफलिस, गोनोरिया, क्लॅमिडीया, एड्स आणि सर्वाइकल कैंसर यासारख्या लैंगिक संबंधित आजारांना (STD)आळा घालण्याचे दक्षिण आशियाई सरकारचे उद्दीष्ट आहे.
गेल्या काही वर्षांत लैंगिक आजारांमध्ये (STD) झालेली वाढ लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये STD मुळे सर्वात जास्त प्रभावित 15 ते 19 आणि 20 ते 24 वयोगटातील लोक होते.
थायलंडमध्ये 2021 मध्ये 15 ते 19 वयोगटातील 1000 थाई मुलींपैकी 24.4 मुलींनी जन्म दिला. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार याच वयोगटातील मुलींचे जागतिक प्रमाण 42.5 आहे.
ब्लूमबर्गचे प्रवक्ते रचडा धांडीरक यांनी सांगितले की, युनिव्हर्सल हेल्थ केअर कार्डधारकांना 1 फेब्रुवारीपासून एका वर्षासाठी आठवड्यातून 10 कंडोम मिळू शकतात. हे कंडोम देशभरात चार आकारात उपलब्ध आहेत. कंडोम फार्मसी आणि रुग्णालयाच्या प्राथमिक काळजी युनिटमधून घेतले जाऊ शकतात. गोल्ड कार्डधारकांना मोफत कंडोम देण्याच्या मोहिमेमुळे आजारांना आळा बसेल आणि सार्वजनिक आरोग्याला चालना मिळेल, असे रचाडा यांनी सांगितले.
थायलंडमध्ये सुमारे सात कोटी लोकांपैकी पाच कोटी लोक गोल्ड कार्डचे लाभार्थी आहेत. गोल्ड कार्ड ही थायलंड सरकारची एक सार्वत्रिक आरोग्य योजना आहे. याच्या मदतीने कार्डधारक सार्वजनिक आणि निवडक खासगी रुग्णालयांमध्ये काही उपचारांसाठी गोल्ड कार्डचा वापर करू शकतात.