मुंबई : सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त अशी मानली जाणारी मॅगी (Story of Maggi) कित्येक लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांना आवडते. या मॅगीवर अनेकांचं प्रेम आहे. प्रचंड भूक लागली आणि घरात कोणतीही भाजी शिल्लक नसेल किंवा तितका वेळ उपाशी राहणं अशक्य असेल तर कित्येक घरांमध्ये थेट मॅगी शिजवली जाते. तुम्ही मॅगीसोबत फक्त पाणी आणि मसाला टाकला तरी भारी मॅगी तयार होते. त्यामुळे फक्त देशातच नाही तर जगभरात या मॅगीला प्रचंड मागणी आहे. पण या मॅगीचा जन्म एका मजबुरीमुळे झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मॅगीने आतापर्यंत बरेच उतार-चढाव पाहिले. तरीही मॅगी आतापर्यंत कायम लोकांची फेव्हरेटच राहिली. या मॅगीची रोमांचक कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मॅगीचा (Story of Maggi) जन्म 1872 साली स्वीत्झर्लंडमध्ये झाला. पाश्चिमात्य देशांमध्ये हा काळ अत्यंत धावपळीचा होता. याच काळात औद्योगिक क्रांती सुरु होती. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलादेखील मिलमध्ये काम करायच्या. मिलमध्ये दिवसभर काम केल्यानंतर महिला प्रचंड थकायच्या. याशिवाय कामाची वेळही जास्त असल्याने महिलांना स्वयंपाक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. महिलांच्या या समस्येवर महिला उद्योगपती ज्यूलियस मॅगी यांनी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या एका मित्रासोबत अथक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलं. त्यांनी मॅगीची निर्मिती केली. अशाप्रकारे या औद्योगिक वातावरणात कामाच्या व्यापाच्या मजबुरीने मॅगीचा जन्म झाला. विशेष म्हणजे ज्यूलियस मॅगी यांनी आपले आडनावच या खाद्य पदार्थाला दिले.
सर्वात आधी जर्मनीत 1897 साली मॅगी नूडल्स सादर करण्यात आले. ज्यूलियस यांनी या काळात अनेक नवनवीत खाद्य पदार्थ आणि सूप बनवले होते. मात्र, दोन मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीला लोकांनी जास्त पसंती दिली. 1912 साली अमेरिका आणि फ्रान्सच्या नागरिकांच्या हातात मॅगी पडली. मात्र, याच वर्षी ज्यूलियस यांचं निधन झालं. ज्यूलियस यांच्या निधनाचा परिणाम मॅगीच्या व्यवसायावर पडला. मात्र, तरीही हा व्यवसाय संथ गतीने सुरु राहिला.
अखेर 1947 साली नेस्टले या कंपनीने मॅगीला विकत घेतलं. त्यानंतर मॅगी घराघरात पोहोचली. मात्र, 1947 नंतरचा प्रवासही चढउतारचा राहिला. नेस्टलेने 80 च्या दशकात मॅगीचे नूडल्स मार्केटमध्ये आणले. मात्र, भारतातला तो काळ प्रचंड आव्हानाचा होता. त्या काळात राजकीय घडामोडीदेखील भरपूर घडत होत्या. एकतर नुकताच देश स्वातंत्र झालेला होता, त्यात फक्त शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्यांसाठी अगदी जवळ वाटेल असा हा खाद्यपदार्थ होता. मात्र, तरीही मॅगीचा प्रवास सुरु राहिला.
हळूहळू बदलत्या लाईफस्टाईलने लोकांना मॅगीकडे आकर्षित केले. त्याला सहसाकरुन टीव्हीवर येणाऱ्या मॅगीच्या जाहीराती देखील कारण ठरु शकतात. दोन मिनिटात मॅगी तयार, अंस सांगणारी जाहिरात, त्यात भर म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार दाखवलेली आई आणि मुलं. त्यामुळे लोकांना ही जाहिरात जास्त जवळची वाटू लागली. विशेष म्हणजे 1991 च्या जागतिकीकरणाने मॅगीला प्रचंड यश मिळवून दिलं. त्यानंतर 1997 साली नेस्टलेने मॅगी तयार करण्याच्या प्रक्रियेत थोडा बदल केला. मात्र, ते बदल लोकांना आवडले नाहीत. मॅगीची मागणी घटल्यानंतर कंपनीने दोन वर्षांनी पुन्हा पूर्वीचीच मॅगी बाजारात आणली. त्यानंतर पुन्हा मॅगी मार्केटमध्ये सुसाट धावली.
मध्यंतरी काही कारणास्तव मॅगीवर निर्बंध आले होते. त्यामुळे मॅगी संकटात सापडली होती. मात्र, निर्बंध मागे हटवल्यानंतर मॅगी मार्केटमध्ये पुन्हा धावायला लागली. लोकांनी मॅगीवर प्रचंड प्रेम केलं आणि ते आताही करत आहेत. कदाचित भविष्यातही नेस्टलेच्या या मॅगीवर असंच लोकांचं प्रेम राहील!