अडीच वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जागतिक कोरोना महामारीचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम (Serious health effects) झाला आहे. विशेषत: दुसऱ्या लाटेच्या वेळी, डेल्टा प्रकाराच्या संसर्गामुळे अधिक नुकसान झाले. संसर्ग झालेल्यांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली. अशा लोकांमध्ये दीर्घ कोव्हिड समस्या (Long covid problem) देखील अधिक दिसून आली आहे. सध्या संसर्गास कारणीभूत असलेल्या ओमिक्रॉन प्रकारांमध्ये संक्रमणाची सौम्य पातळी असल्याचे मानले जात आहे. परंतु, काही लोकांमध्ये ते गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण करत असल्याचे नोंदवले गेले आहे. फुफ्फुस आणि हृदय हे शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव आहेत जे कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित होतात. मग कोरोना महामारीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये (heart disease patients) वाढ झाली आहे का? हा प्रश्नही उपस्थित होत आहे कारण गेल्या दोन वर्षांत देशात हृदयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
डेटा दर्शवितो की जानेवारी ते जून 2021 या कालावधीत, हृदयविकाराच्या झटक्याने दरमहा सुमारे 3,000 लोकांचा मृत्यू झाला आहे, जो 2020 मध्ये सुमारे 500 होता. गेल्या वर्षी जूनपर्यंत मुंबईत झालेल्या एकूण 75,165 मृत्यूंपैकी सुमारे 23.8 टक्के (17,880) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते. या संसर्गामुळे हृदयाच्या समस्या वाढत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
माध्यमांशी बोलतांना ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित पेंडारकर(दिल्ली) असे म्हणतात की, हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमागे कोरोना संसर्ग हे एक प्रमुख कारण आहे. हृदयविकार हे भूतकाळातील एक मोठे संकट होते. कोरोना महामारीनंतर वाढलेल्या ह्रदयरोगींची चिंता निश्चितच वाढली आहे. असे अनेक लोक, विशेषत: तरुणांना हृदयविकाराच्या गंभीर आजाराचे निदान झाले आहे. ते कोरोना विषाणूंची लागण होण्यापूर्वी पूर्णपणे निरोगी होते. यावरून हे स्पष्ट होते की, जागतिक स्तरावर हृदयविकाराच्या वाढीमागे कोरोना महामारी कारणीभूत ठरू शकते, लोकांनीही त्याच्या प्रतिबंध आणि निदानासाठी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गामुळे हृदयावर होणारे परिणाम शोधण्यासाठी केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की, हा संसर्ग काही परिस्थितीमध्ये शिरा आणि धमन्यांच्या आतील पृष्ठभागावरही परिणाम करतो. ज्यामुळे रक्तवाहिन्यांना जळजळ होऊ शकते. याशिवाय, संसर्ग झाल्यास लहान वाहिन्यांचे नुकसान आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या देखील आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तप्रवाहावर परिणाम होतो. हृदयातील रक्ताभिसरण बिघडल्याने तुम्हाला विविध प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अन्वर.एम. खान सांगतात, गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता तरुणांमध्ये हृदयविकार आणि अचानक हृदय बंद(हार्ट फेल) पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या तरुणांना कोरोना झाला होता त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये ट्रोपोनिन वाढलेले आणि हृदयाच्या एमआरआयमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्याचे देखील आढळून आलेले आहे. ही गंभीर चिन्हे असून, त्याशिवाय ज्या लोकांना आधीच हृदयविकाराची समस्या आहे, अशा रुग्णांना संसर्ग झाला तर यामुळे रुग्णांमध्ये गंभीर गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका देखील वाढतो.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशात ज्या प्रकारे हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, हा धोका लक्षात घेता सर्व लोकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. संसर्गातून बरे झाल्यानंतर काही काळापासून तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होत असेल, तर याबाबत तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. निरोगी व्यक्तींनीही आहार आणि नियमित व्यायामाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तरुणांमध्येही हृदयविकार आणि त्याची गुंतागुंत वाढत आहे, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.