मुंबई : चहापत्तीमध्ये कीटकनाशके आणि रसायनांची मर्यादा ओलांडल्याचे आढळून आल्यानंतर आता चहाच्या (Tea) निर्यातीवर (Export) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. अनेक ग्राहकांनी भारतीय चहाला घेण्यास नकार दिला असल्याने याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडताना दिसून येत आहे. मागणीत घट झाल्याने भारतीय चहा उत्पादकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय (International) आणि देशांतर्गत बाजारातून भारतीय चहाची खेप परत केल्यानंतर त्याच्या किमतीत घट झाली आहे. चहाच्या पानात कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने खरेदीदारांनी ते घेण्यास नकार दिला. आता चहाचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांनी घसरल्याने उत्पादकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
गेल्या एका महिन्यात चहाच्या किमतीत 27 रुपयांची घट झाली असून किंमत प्रतिकिलो 214 वरून 187.06 प्रतिकिलोवर आली आहे. यामुळे दुसऱ्या हंगामात चहाच्या किमती आणखी कमी होण्याची भीती उत्पादकांना आहे. देशाबाहेरील निर्यात घटल्याने याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम चहा उद्योगावर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशात विकली जाणारी सर्व प्रकारची चहा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या (FSSAI) मानदंडांचे पालन करत असल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी, चहाच्या पानांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त कीटकनाशके आणि रसायने आढळून आल्याने चहा व्यापाऱ्यांनी आपली खरेदी रद्द केली. ‘बिझनेस लाइन’नुसार, कोलकाता लिलावात खरेदीदारांनी सुमारे 39 हजार किलो चहा परत पाठविला आहे. गतवर्षी 226.77 रुपये किलो दराने चहा विकला गेला होता, मात्र यंदा त्याचा सरासरी भाव 186.41 रुपये किलो आहे.
एका रिपोर्टनुसार, चहाच्या किमती घसरल्याचा कीटकनाशके आणि रसायनांच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चहाची मागणी कमी आहे. केनियामध्ये चहाच्या कमी किमतीमुळे भारतीय चहाची मागणी घटली आहे. चहामध्ये अधिक कीटकनाशके आणि रसायने आल्याने निर्यात कमी झाली, तर देशांतर्गत बाजारातही चहाचे दर घसरतील, असे सांगण्यात आले आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे, भारतीय चहा उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवण्याची मोठी संधी होती, परंतु मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशके आणि रसायनांचा वापर केल्याने मोठा फटका बसल्याचेही बोलले जात आहे.
हवामान बदलामुळे चहाच्या पानांवर किडींचा हल्ला वाढला आहे. त्यामुळे कीटकांपासून संरक्षण मिळविण्यासाठी चहाच्या बागांमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. कीटकनाशकांचा पानांवर काही प्रमाणात अंश राहत असल्याने कीटकनाशकांचा वापर झाल्यानंतरच पाने तोडली जातात. कीटकनाशक फवारल्यानंतर साधारणतः 10 ते 20 दिवसांनी पाने तोडली जातात. असे न केल्यास साहजिकच पानांमध्ये कीटकनाशकांचे अंश जास्त प्रमाणात दिसून येत असते. 25 मे रोजी भारतीय चहा मंडळाने सर्व उत्पादक आणि एजंट यांना याबाबतचे निरीक्षण करण्याचे निर्देश जारी केले होते.