एखाद्या व्यक्तीचे वजन वेगाने कमी होणे हेच नव्हे तर वजन वाढणे (weight gain) हीसुद्धा आरोग्याशी (health) निगडीत एक समस्या आहे. आजकाल बहुतांश लोक हे वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी ते जिममध्ये व्यायाम करत (exercise) तासनतास घाम गाळत असतात तसेच महागडे डाएट प्लानही फॉलो करत असतात. वाढत्या वयानुसार योग्य पद्धतीने वजन वाढत असेल तर ते ठीक असते. मात्र वजन अती वाढले तर त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो, तसेच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
बऱ्याच वेळेस खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे वजन वाढण्यामागचे कारण मानले जाते. मात्र काही वेळा एखादा आजार हेही वजन वाढण्यामागचे कारण असू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? इथे आपण अशा काही आजारांबद्दल जाणून घेऊया, जे वजन वेगाने वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
टाइप-2 मधुमेह :
शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नसेल तर अशा परिस्थितीतही वजन कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जेव्हा शरीरात इन्सुलिनचा परिणाम होतो, तेव्हा आपण डायबेटिसचे रुग्ण बनतो. संशोधनानुसार, टाइप 2 मधुमेह असलेल्या 10 पैकी 8 लोकांना वजन वाढल्याने त्रास होतो. तसेच, ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांना मधुमेह होऊ शकतो. जर तुमचा जनुकीय इतिहास मधुमेहाचा असेल तर वेळीच वजन कमी करायला सुरुवात करा.
उच्च रक्तदाब :
रक्तदाब आणि वजन वाढणे यांचा थेट संबंध असतो, असे मानले जाते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नेहमीच त्यांचे वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे रक्तदाबाचा त्रास होतो. यामध्ये धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते आणि रक्तप्रवाहात अडचण निर्माण होऊ शकते. रक्तदाब योग्य नसेल, तर हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही रक्तदाब तपासणे गरजेचे आहे.
थायरॉईड :
अनेक संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, थायरॉईडच्या रुग्णांना वजन कमी होणे अथवा वजन वाढणे या दोन्ही परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. वजनात थोडाही बदल होत असेल तर थायरॉईडवर तातडीने उपचार करावेत, असा सल्लाही डॉक्टर देतात. थायरॉईड ही एक ग्रंथी असते, जी हार्मोन्सची पातळी नियंत्रित करते. थायरॉईड प्रभावित झाल्यास शरीरात अनेक बदल होतात, ज्यामध्ये वजनाशी संबंधित समस्यांचाही समावेश असतो.